इरिगेशन फेडरेशन करणार चक्का जाम! शासकीय पाणीपट्टी दरवाढ व कृषी पंपांना जलमापक यंत्र बसविण्यास विरोध
बुधवारी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय महामार्ग रोखणार
कोल्हापूर प्रतिनिधी
कृषिपंपाची शासकीय दहापट पाणी पट्टी दरवाढ रद्द करून सवलतीच्या दराने पाणीपुरवठा करावा आणि शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरल्यानंतर राहिलेली मागील थकबाकी रद्द करावी यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी 12 वाजता पंचगंगा पुलावर सर्वपक्षीय राष्ट्रीय महामार्ग रोको व चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.
इरिगेशन फेडरेशनच्या प्रमुख मागण्या, कृषिपंपाची शासकीय दहापट पाणी पट्टी दरवाढ रद्द करून सवलतीच्या दराने पाणीपुरवठा करावा आणि शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरल्यानंतर राहिलेली मागील थकबाकी रद्द करावी. राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग जोपर्यंत घनमिटर पद्धतीने पाणी वाटप करीत नाही, तोपर्यंत कृषिपंपाना जलमापक मीटरची सक्ती नको, शासनाच्या योजनांवर ज्याप्रमाणे 81 टक्के वीज बिल शासन भरते आणि 19 टक्के शेतकरी त्याप्रमाणे सहकारी पाणीपुरवठा संस्थांची आकारणी व्हावी. भ्रष्टाचार थांबवावा व 20 टक्के लोकल फंड रद्द करावा आदी प्रमुख मागण्यासाठी सातत्याने राज्यशासनाकडे पाठपुरावा करुन सुद्धा शासनाने सर्व सामान्य शेतकऱ्यांचा विचार केलेला नाही. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्हयातील सहकारी पाणी पुरवठा संस्था सभासद शेतकरी व व्यक्तीगत शेतकऱ्यांकडून राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी पंचगंगा पुलाशेजारी सर्वपक्षीय शेतकरी लाखोच्या संख्येने सहभागी होऊन रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.