धामणी प्रकल्पाच्या शेतकऱ्यांना उपोषणाची वेळ येणार नसल्याचा पाटबंधारे खात्याचे आश्वासन
म्हासुर्ली / वार्ताहर
राई (ता.राधानगरी ) येथील धामणी मध्यम प्रकल्पाची पावसाळ्यात केली जाणारी घळभरणी काही तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे येत्या ऑक्टोबर पूर्वी घळभरणीच्या अनुषंगिक सर्व कामे जवळपास पूर्ण झाली असून पुढील वर्षी प्रकल्पात एक टीएमसी पाणी साठविण्याचे उदिष्ट आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळच येणार नाही असे मत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी व्यक्त केले.
धामणी धरण प्रकल्प स्थळावर मंगळवारी शेकडो लाभधारक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले बांदिवडेकर यांनी स्पष्ट केले. मात्र यावेळी धामणी धरण कृती समितीने येत्या १ ऑक्टोंबर पासून धामणी प्रकल्पाची घळभरणीचे काम हाती नघेतल्यास प्रकल्प स्थळावर आमरण उपोषण करण्यावर ठाम राहत तशा अशयाचे निवेदन संबंधित कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांना देण्यात आले.
गेल्या 20 वर्षापासून धामणी प्रकल्पाचे काम विविध कारणाने रखडले असून धामणी खोऱ्यात उन्हाळ्याच्या काळामध्ये तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागते. गतवर्षी लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने यावर्षीच्या पावसाळ्यात घळभरणी करून पाणी साठवण करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र यावर्षी घळभरणीच्या कामात तांत्रिक अडचणी येणार असल्याचे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत संबंधितांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार धामणी खोरा विकास कृती समितीने प्रशासनाच्या तांत्रिक अडचण मान्य करून १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सर्व पुनर्वसनाची कामे व इतर आढतळे पूर्ण करून घळभरणीच्या कामास सुरुवात करावी अन्यथा प्रकल्प स्थळावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
त्यावेळी झालेल्या शेतकरी व पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकी जून मध्ये आढावा बैठक घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार मंगळवारी शेतकरी व अधिकारी यांच्यात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी पाटबंधारे कार्यकारी अभियंता बांदिवडेकर यांनी येत्या ऑक्टोबरमध्ये घरभरणी करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी तयारी केली असून काही किरकोळ परवानग्या घेणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे ठरल्याप्रमाणे घळभरणीचे काम सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी कृती समितीच्या वतीने संबंधितांना निवेदन देण्यात आले.यावेळी कृती समितीच्या वतीने राजाराम पात्रे, मनोज देसाई,उदय देसाई, रवींद्र पाटील, संभाजी पाटील, पांडुरंग पाटील, संजय पाटील, राम चौगुले,एन.एस पाटील, पृथ्वीराज भोसले आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.