For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओलमणी येथे अनियमित पाणीपुरवठा

11:15 AM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओलमणी येथे अनियमित पाणीपुरवठा
Advertisement

नागरिकांची पाण्यासाठी भटकंती, ग्रा. पं. चे दुर्लक्ष : त्वरित उपाययोजना करण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर/जांबोटी

ओलमणी येथे गेल्या वर्षभरापासून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नळ पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ओलमनी गावाला जलनिर्मल योजनेअंतर्गत घरोघरी नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात आली असून, गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मलप्रभा नदीतून जलवाहिन्यांद्वारे गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. मलप्रभा नदीच्या पात्रात बारमाही मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतो. दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात गावाला या योजनेअंतर्गत सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र गेल्या दोन वर्षापासून गावाला अनियमित व अपुरा पाणीपुरवठा असल्यामुळे  भटकंती करावी लागत आहे.

Advertisement

पिण्याच्या पाण्यासाठी खासगी कूपनलिकांवर अवलंबून

प्रत्येक गल्लीला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु गेल्या दोन वर्षापासून नळ पाणीपुरवठा योजनेत उद्भवत असलेल्या तांत्रिक बाबीची सबब पुढे करून गावाला अनियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जलवाहिन्या फुटणे, विद्युत मोटारीत बिघाड, अनियमित वीज पुरवठा यासारखी कारणे पुढे करून गावाला केवळ आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच गावामध्ये जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळत्या लागल्यामुळे त्यामधून शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. गावात दोन सार्वजनिक विहिरी व एक कूपनलिका कार्यान्वित असली तरी त्याचे पाणी पिण्याअयोग्य असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी नागरिक खासगी कूपनलिकांवर अवलंबून आहेत.

पूर्णवेळ वॉटरमनची नियुक्ती करण्याची आवश्यकता 

ओलमणी नळपाणी योजनेसाठी ग्राम पंचायतीने नियुक्त केलेल्या वॉटरमनने मागील वर्षी नोकरीचा राजीनामा दिल्यामुळे सध्या ती जागा रिक्तच आहे. ग्राम पंचायतीने गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी जांबोटी येथील वॉटरमनकडे तात्पुरता कार्यभार सोपवला आहे. मात्र गावचा विस्तार मोठा असल्यामुळे ओलमणी गावाला पूर्णवेळ वॉटरमनची आवश्यकता आहे. या पदासाठी गावातीलच व्यक्तीची नियुक्ती करण्याची आवश्यकता असून ग्राम पंचायतने त्वरित ओलमणी गावासाठी पूर्ण वेळ वॉटरमन नियुक्त करावा, अशी मागणी होत आहे. तरी जांबोटी ग्राम पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून ओलमणी नळपाणी योजनेत उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्या दूर करून गावाला किमान दिवसाआड सुरळीत पाणीपुरवठा करून नागरिकांचे पाण्याअभावी होणारे हाल दूर करावेत, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.