For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जांबोटी भागात अनियमित वीजपुरवठा

09:57 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
जांबोटी भागात अनियमित वीजपुरवठा
Advertisement

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नळपाणी योजनेसह दैनंदिन व्यवहार कोलमडले

Advertisement

वार्ताहर /जांबोटी

जांबोटी-कणकुंबी भागात गेल्या महिन्याभरापासून अनियमित व कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्यामुळे पुरेशा विजेअभावी या भागातील नळ पाणीपुरवठ्यासह विजेवर चालणारे दैनंदिन व्यवहार ठप होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. जांबोटी विभागातील सुमारे 30 ते 35 गावासाठी बेळगाव (मच्छे) येथील वीज वितरण केंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र जांबोटी भागासाठी उप वीजकेंद्राची सुविधा अद्याप उपलब्ध नसल्यामुळे या भागाला थेट वीज वाहिन्याद्वारे वीजपुरवठा करण्यात येत असल्याने या भागातील पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात तांत्रिक समस्या उद्भवत आहेत. या भागातील वीज पुरवठ्यावर विपरित परिणाम होत असल्यामुळे अपुऱ्या तसेच अनियमित वीजपुरवठ्यामुळे जनतेचे हाल होत आहेत.

Advertisement

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे वीजपुरवठ्याच्या मागणीत वाढ झाली आहे. जांबोटी भागातील वीजपुरवठा केवळ वीजवाहिन्याद्वारे होत असल्यामुळे वाढीव विजेचा भार वीजवाहिन्यांवर पडून वीजपुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे या भागात गेल्या महिन्याभरापासून कमी दाबाचा पुरवठा होत असल्यामुळे या भागातील नळ पाणीपुरवठा पुरेशा विजेअभावी ठप्प झाल्यामुळे ऐन उन्हाळ्dयात अनेक गावात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच दळप-कांडप व विजेवर चालणारे इतर व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत असल्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत मोटारी व इतर विद्युत उपकरणे देखील निकामी झाली आहेत. पिकांना वेळेत पाणीपुरवठा उन्हाळी पिके पाण्याअभावी करपून जात आहेत.

अघोषित भारनियमन

या भागातील नागरिकांना कमी दाबाच्या वीज पुरवठ्याबरोबरच मोठ्या प्रमाणात अघोषित भारनियमनचा देखील मुकाबला करावा लागत आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 6-7 वाजेपर्यंत या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. अनेकवेळा रात्री देखील वीजपुरवठा गायब होत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सध्या सर्वत्र वार्षिक परीक्षाचे दिवस सुरू आहेत. मात्र विजेअभावी विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासावर देखील विपरीत परिणाम होत आहे. तरी खानापूर हेस्कॉम उपविभागाच्या अधिकारी वर्गाने लक्ष घालून जांबोटी भागातील वीजपुरवठ्यात उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्या दूर करून या भागाला सुरळीत वीजपुरवठा करावा व विजेअभावी नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.