आयर्नमॅन 70.3 गोवा 2026 चे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन; 30 देशांतील 2 हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग
2019 मध्ये सुमारे 1 हजार सहभागींसह सुरू झालेल्या या स्पर्धेने यंदा 2 हजारांहून अधिक स्पर्धकांचा टप्पा गाठला आहे. गेल्या काही वर्षांत स्पर्धेची लोकप्रियता सातत्याने वाढली असून, आयर्नमॅन गोवा हे जागतिक क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे आकर्षण बनले आहे. भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धांमध्येही या स्पर्धेने आपले स्थान निर्माण केले आहे.
आयर्नमॅन 70.3 ही स्पर्धा खेळाडूंच्या शारीरिक क्षमता, सहनशक्ती आणि मानसिक कणखरतेची कसोटी पाहणारी आहे. पोहणे, सायकलिंग आणि धावणे अशा तीन क्रीडा प्रकारांचा यात समावेश आहे. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभागी झाले असून, आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत भारतीय आणि गोमंतकीय खेळाडूंनाही आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे.
या स्पर्धेमुळे गोव्याचे आंतरराष्ट्रीय क्रीडा पर्यटन केंद्र म्हणून महत्त्व वाढत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधोरेखित केले. अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे गोव्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळत असून, पर्यटन, हॉटेल व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय पथके आणि स्वयंसेवकांनी दिलेल्या योगदानाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. स्पर्धेचे नियोजन, खेळाडूंची सुरक्षितता आणि व्यवस्थापनासाठी विविध यंत्रणांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
‘गोवा ग्लोबल बनत आहे, क्रीडा क्षेत्र एकत्र आणते आणि उत्कृष्टता प्रेरणा देते’, या संदेशातून गोव्याची जागतिक क्रीडा क्षेत्रातील वाढती वाटचाल अधोरेखित झाली. आयर्नमॅन 70.3 च्या सहाव्या पर्वामुळे गोव्याच्या क्रीडा आणि पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.