भाजपकडून द्रमुक सरकारवर उपरोधिक टीका
वृत्तसंस्था/ चेन्नई
उदयनिधी स्टॅलि यांना तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री करण्यात आल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी सोमवारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी द्रमुकला लक्ष्य करत उपरोधिक टीका केली आहे. सूर्य काही विशेषाधिकार असलेल्या लोकांसाठीच उगवत असल्याचे अण्णामलाई यांनी म्हटले आहे. उगवता सूर्य हे द्रमुकचे निवडणूक चिन्ह आहे.
तामिळनाडूच्या एम.के. स्टॅलिन मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला आहे. स्टॅलिन यांनी स्वत:चे पुत्र उदयनिधी यांना यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. तर भ्रष्टाचारप्रकरणी आरोपी असलेल्या सेंथिल बालाजी यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. भाजपने एक मीम देखील शेअर केले असून याद्वारे द्रमुकवर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे.
मागील 40 दिवसांपासून सूर्य विशेषाधिकार प्रात लोकांसाठी उगवत आहे. तर राज्याच्या उर्वरित हिस्स्यांमध्ये ग्रहण लागले आहे. लोक आता ‘विदियल’ शब्दाचा खरा अर्थ काय आहे हे समजून चुकले आहेत असे अण्णामलाई यांनी म्हटले आहे. तमिळ शब्द विदियलचा अर्थ आरंभ असून हा शब्द 2021 च्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या स्वत:च्या प्रचारमोहिमेत द्रमुकने वापरला होता.