Crime News : चिपळुणात 74 लाखांच्या लोखंडी वीजखांबांची चोरी, 4 जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी चार जणांवर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
चिपळूण : चिपळुणात 74 लाखाचे लोखंडी वीजखांब चोरीस -सावर्डे महावितरण सबस्टेशन परिसरातील घटना घडली आहे. तीन ट्रेलर चालकासह अन्य एकावर गुन्हा चिपळूण सावर्डे महावितरण सबस्टेशनचे 74 लाख 84 हजार 98 रुपये किंमतीचे लोखंडी वीजखांब चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5 ते रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी तीन ट्रेलर चालकांसह अन्य एकावर सावर्डे पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ट्रेलर चालक सुरेश खारोल (राजस्थान) यासह अन्य दोन ट्रेलर चालक तसेच कंपनीचा माल घेऊन जाण्याबाबत सांगणारा साहिल मलिक अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबतची फिर्याद अखिलेश कुमार लालताप्रसाद प्रजापती (47, मूळ-मुंबई, सध्या-खेड) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावर्डे महावितरण सबस्टेशनच्या शेजारी सचिन वारे यांच्या वहाळफाटा येथील मोकळ्या जागेत हे वीजखांब ठेवण्यात आले होते. असे असताना वरील गुन्हा दाखल झालेल्या चौघांनी लोखंडी 450 वीजखांब चोरुन नेले.
यामध्ये 10 लाख 61 हजार 349 रुपये किंमतीचे 152/152 साईझचे 10 मिटर लांबीचे लोखंडी 44 वीजखांब, 8 लाख 6 हजार 727 रुपये किंमतीचे 152/152 साईझचे 13 मिटर लांबीचे लोखंडी 27 वीजखांब तर 56 लाख 16 हजार 22 रुपये किंमतीचे 100/116 साईझचे 10 मिटर लांबीचे लोखंडी 379 वीजखांब याचा समावेश आहे. हा प्रकार अखिलेश प्रजापती यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.