मिलिटरी महादेव मंदिर रोडवरील लोखंडी बॅरेल हटविले
वाहनचालकांच्या मागणीला यश
बेळगाव : मिलिटरी महादेव मंदिरानजीकच्या रस्त्यावर अवजड वाहतूक रोखण्यासाठी बॅरेल ठेवण्यात आले होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर सोमवारी हे बॅरेल हटविण्यात आले. परंतु ग्लोब थिएटर शेजारील रोडवर अद्याप लोखंडी बॅरेल तसेच आहेत. त्यामुळे ते बॅरेलदेखील कॅन्टोन्मेंटने हटविण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे. कॅम्पच्या अंतर्गत भागात शाळा, महाविद्यालये, तसेच रहिवासी वसाहती आहेत. या वसाहतींमधून अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने अवजड वाहनांना बंदी घातली होती. तरीदेखील वाहतूक सुरू असल्यामुळे अखेर मिलिटरी महादेव मंदिर व ग्लोब थिएटरनजीक लोखंडी बॅरेल ठेवण्यात आले. परंतु हे बॅरेल वाहतुकीसाठी अडचणीचे ठरू लागले. तसेच यामुळे अपघातही वाढले.
‘तरुण भारत’ने उठविला आवाज
वाहनचालकांच्या तक्रारी वाढू लागल्या. तसेच ‘तरुण भारत’ने या विरोधात आवाज उठविल्याने मिलिटरी महादेव मंदिरानजीकचे लोखंडी बॅरेल अखेर हटविण्यात आले. यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे. तसेच इतर भागातीलही बॅरेल हटवावेत, अशी मागणी केली जात आहे.