For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयर्लंड-द.आफ्रिका मालिका बरोबरीत

06:33 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयर्लंड द आफ्रिका मालिका बरोबरीत
Advertisement

रॉस अॅडेर ‘सामनावीर’ व ‘मालिकावीर’, आयर्लंड 10 धावांनी विजयी

Advertisement

वृत्तसंस्था / अबु धाबी

अॅडेर बंधूंच्या शानदार कामगिरीच्या जोरावर येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आयर्लंडने द. आफ्रिकेचा 10 धावांनी पराभव करत दोन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली. आयर्लंडच्या रॉस अॅडेरला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असा दुहेरी मुकुट देण्यात आला. या मालिकेतील पहिला सामना द. आफ्रिकेने एकतर्फी जिंकला होता. त्यानंतर आयर्लंडने दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवून द. आफ्रिकेला मालिका विजयापासून रोखले.

Advertisement

या दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी दिली. रॉस अॅडेरच्या शानदार शतकाच्या जोरावर आयर्लंडने 20 षटकात 6 बाद 195 धावा जमविल्या. त्यानंतर द. आफ्रिकेने 20 षटकात 9 बाद 185 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर त्यांना हा सामना गमवावा लागला.

आयर्लंडच्या डावामध्ये रॉस अॅडेरने 58 चेंडूत 9 षटकार आणि 5 चौकारांसह 100 धावा झोडपल्या तर कर्णधार स्टर्लिंगने 31 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 52 धावा जमविल्या. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 13 षटकात 137 धावांची शतकी भागिदारी केली. कॅम्फरने 13 चेंडूत 1 चौकारांसह 20 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 10 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडला 10 आवांतर धावा मिळाल्या. द. आफ्रिकेतर्फे मुल्डेरने 2 तर एन्गिडी, विलीयम्स व व्रुगेर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आयर्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 59 धावा जमविल्या. आयर्लंडचे अर्धशतक 33 चेंडूत, शतक 57 चेंडूत, दीड शतक 85 चेंडूत फलकावर लागले. अॅडेरने आपले अर्धशतक 32 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने तर शतक 57 चेंडूत 9 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकविले. स्टर्लिंगने 29 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक नोंदविले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेच्या डावात सलामीच्या रिकेल्टनने 22 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह 36, हेंड्रीक्सने 32 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 51, ब्रिझेकीने 41 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 51 धावा जमविल्या. रिक्लेटोन आणि हेन्ड्रीक्स यांनी सलामीच्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 33 चेंडूत नोंदविली. हेन्ड्रीक्स आणि ब्रिझेकी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 71 धावांची भागिदारी केली. आयर्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर द. आफ्रिकेचे 7 फलंदाज 64 धावांत तंबूत परतले. द. आफ्रिकेच्या डावात 8 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. त्यांना 10 अवांतर धावा मिळाल्या. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 53 धावा जमविताना एक गडी गमविला. द. आफ्रिकेचे अर्धशतक 32 चेंडूत, शतक 66 चेंडूत आणि दीडशतक 93 चेंडूत फलकावर लागले. आयर्लंडतर्फे मार्क अॅडेरने 31 धावांत 4, हुमेने 25 धावांत 3 तसेच व्हाईट आणि हंफ्रेज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आता या मालिकेनंतर उभय संघात वनडे मालिका खेळविली जाणार आहे.

संक्षिप्त धाफलक: आयर्लंड 20 षटकात 6 बाद 195 (रॉस अॅडेर 100, स्टर्लिंग 52, डॉक्रेल 20, अवांतर 10, मुल्डेर 2-51, एन्गिडी, विलियम्स, व्रुगेर प्रत्येकी 1 बळी), द. आफ्रिका : 20 षटकात 9 बाद 185 (रिकेल्टनने 36, हेन्ड्रीक्स 51, ब्रिझेकी 51, अवांतर 10, मार्क अॅडेर 4-33, हुमे 3-25, हंप्रेज, व्हाईट प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :

.