हॉकी प्रो लीगसाठी आयर्लंडला बढती
वृत्तसंस्था / लॉसेन (स्वीस)
2025-26 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत आयर्लंडच्या महिला हॉकी संघाला बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2018 च्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविणारा आयर्लंड महिला हॉकी संघ पुढील वर्षीच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
या वर्षाच्या प्रारंभी चिलीत खेळविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या नेशन्स चषक महिलांच्या हॉकी स्पर्धेत न्यूझीलंड महिला संघाने विजेतेपद मिळविले तर आयर्लंड महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आयर्लंड महिला संघाच्या या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने त्यांना पुढील वर्षीच्या महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेसाठी संधी दिली आहे. नेशन्स चषक हॉकी स्पर्धेतील उपविजेत्या संघालाही प्रो लीग हॉकी स्पर्धेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय हॉकी फेडरेशनने घेतल्याची माहिती अध्यक्ष तयाब इक्रम यांनी दिली.
आता 2025-26 च्या कालावधीत होणाऱ्या महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत आयर्लंडचा संघ दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष तयाब इक्रम यांनी आयर्लंड महिला संघाचे खास अभिनंदन केले आहे. 2026 ची महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी पात्र फेरीची स्पर्धा नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये घेतली जाणार आहे.
2024-25 च्या महिलांच्या प्रो लीग हॉकी हंगामात भारतीय महिला हॉकी संघाची कामगिरी निकृष्ट झाली असून त्यांना शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर भारतीय महिला हॉकी संघाची पदावनती झाली असून त्यांना हॉकी नेशन्स चषक स्पर्धेत खेळावे लागणार आहे. पुरुषांच्या विभागात न्यूझीलंडच्या संघाने मलेशियात झालेल्या नेशन्स चषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद मिळविल्याने त्यांना पुढील वर्षी होणाऱ्या पुरुषांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत दाखल होण्याचे निमंत्रण आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने दिले आहे.