For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयर्लंडची झिंबाब्वेवर पहिल्या डावात 40 धावांची आघाडी

06:19 AM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयर्लंडची झिंबाब्वेवर पहिल्या  डावात 40 धावांची आघाडी
Advertisement

वृत्तसंस्था/बेलफास्ट

Advertisement

येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात आयर्लंडने शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात 40 धावांची महत्वपूर्ण आघाडी झिंबाब्वेवर घेतली आहे.

या एकमेव सामन्यात झिंबाब्वेचा पहिला डाव 210 धावांत आटोपल्यानंतर  आयर्लंडने पहिल्या डावात 250 धावांपर्यंत मजल मारली. आयर्लंडच्या पहिल्या डावामध्ये सलामीच्या पिटर मूरने 105 चेंडूत 11 चौकारांसह 79 धावा झळकविल्या. मॅकब्राईनने 2 चौकारांसह 28, स्टर्लिंगने 2 चौकारांसह 22 तर  हंपरेसने 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 27 धावा जमविल्या. आयर्लंडच्या पहिल्या डावात झिंबाब्वेकडून आणखी एक विक्रम नोंदविला गेला. झिंबाब्वेने 59 अवांतर धावा दिल्या. झिंबाब्वेतर्फे मुझारबनी, चिवांगा यांनी प्रत्येकी 3 तर छेत्रा आणि विलियम्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. झिंबाब्वेने बिनबाद 12 या धावसंख्येवरुन शनिवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि उपाहारापर्यंत त्यांनी 30 षटकात 3 बाद 96 धावा जमविल्या होत्या. झिंबाब्वेने आयर्लंडवर 56 धावांची आघाडी मिळविली. झिंबाब्वेच्या दुसऱ्या डावात गुंबे 24 धावांवर तर मॅसव्हेरे 12 धावांवर  आणि कर्णधार इर्व्हिन 7 धावांवर बाद झाले. मेयर्स आणि विलिमस् ही जोडी उपाहारावेळी अनुक्रमे 25 आणि 20 धावांवर खेळत आहे. आयर्लंडतर्फे अॅडेर, मॅक्रेथी आणि यंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आयर्लंडचा सलामीचा फलंदाज पिटर मूरचा जन्म झिंबाब्वेत झाल्याने त्याची ही कामगिरी आठवणीत राहिल.

Advertisement

यष्टीरक्षक मडांडेचा नवा विक्रम

झिंबाब्वेचा यष्टीरक्षक क्लाईव्ह मडांडेने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अवांतर धावा देण्याचा अनोखा विक्रम केला. आयर्लंडबरोबर सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात 24 वर्षीय मडांडेला पहिल्याच दिवशी फलंदाजी करताना खाते उघडता आले नव्हते. त्यानंतर त्याने आयर्लंडच्या पहिल्या डावात 59 अवांतर धावा दिल्या असून त्यामध्ये 42 बाईज, 5 लेगबाईज, 3 नोबॉल आणि 9 वाईड यांचा समावेश आहे. यष्टीरक्षकाकडून सर्वाधिक बाईज देण्याचा मडांडेचा हा कसोटीतील नवा विक्रम असून त्याने 1934 साली इंग्लंडचा यष्टीरक्षक अॅमिसने नोंदविलेला 37 बाईजचा विश्वविक्रम मागे टाकला आहे.

संक्षिप्त धावफलक : झिंबाब्वे प. डाव: 71.3 षटकात सर्वबाद 210 (मॅसव्हेरे 74, गुंबे 49, विलियम्स 35, मॅकार्थी आणि मॅकब्राईन प्रत्येकी 3 बळी, अॅडेर 2 बळी, यंग, कॅम्फर प्रत्येकी 1 बळी), आयर्लंड प. डाव: 58.3 षटकात सर्वबाद 250 (पिटर मूर 79, स्टर्लिंग 22, मॅकब्राईन 28, हंप्रेस नाबाद 27, अवांतर 59, मुझारबनी, चिवांगा प्रत्येकी 3 बळी, चेलरा आणि विलियम्स प्रत्येकी 1 बळी). झिंबाब्वे दु. डाव 3 बाद 96 (गुंबे 24, मेअर्स  खेळत आहे 25, इर्व्हिन 7, विलियम्स खेळत आहे 20, अॅडेर, मॅकार्थी, यंग प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :

.