आयर्लंडचा झिंबाब्वेवर चार गड्यांनी विजय
एकमेव कसोटी सामना, अँडी मॅकब्राईन सामनावीर
वृत्तसंस्था/ बेलफास्ट
येथे आयोजित केलेल्या एकमेव कसोटी सामन्यात यजमान आयर्लंडने रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी झिंबाब्वेचा 4 गड्यांनी पराभव केला. आयर्लंड संघातील अँडी मॅकब्राईनने अष्टपैलू कामगिरी केल्याने त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. मॅकब्राईनने फलंदाजीत 83 धावा झळकाविल्या तर गोलंदाजीत त्याने 75 धावांत 7 गडी बाद केले.
या कसोटीमध्ये झिंबाब्वेचा पहिला डाव 210 धावांत आटोपल्यानंतर आयर्लंडने पहिल्या डावात 250 धावा जमवित 40 धावांची आघाडी घेतली. आयर्लंडच्या मॅकब्राईनने झिंबाब्वेच्या पहिल्या डावात 37 धावांत 3 गडी बाद केले. तर आयर्लंडच्या पहिल्या डावात त्याने 28 धावांचे योगदान दिले. आयर्लंडच्या डावामध्ये पिटर मूरने अर्धशतक झळकाविले. 40 धावांनी पिछाडीवर असलेल्या झिंबाब्वेचा दुसरा डाव 71 षटकात 197 धावांत आटोपला. मेयर्सने 4 चौकारांसह 57, विल्यम्सने 4 चौकारांसह 40, गुंबेने 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. आयर्लंडतर्फे मॅकब्राईनने 38 धावांत 4 तर अॅडेर आणि यंग यांनी प्रत्येकी 2, मॅकार्थी व हंम्फ्रेसने प्रत्येकी 1 गडी बाद केला. आयर्लंडला निर्णायक विजयासाठी झिंबाब्वेकडून 158 धावांचे आव्हान मिळाले. आयर्लंडने दुसऱ्या डावात 36.1 षटकात 6 बाद 158 धावा जमवित हा सामना 4 गड्यांनी जिंकला. झिंबाब्वेच्या भेदक गोलंदाजीसमोर आयर्लंडची एकवेळ स्थिती 5 बाद 21 अशी केविलवानी झाली होती. त्यानंतर टकेर आणि मॅकब्राईन यांनी सहाव्या गड्यासाठी 96 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. टकेरने 10 चौकारांसह 56 धावा झळकाविल्या. मॅकब्राईनने आणि अॅडेर या जोडीने सातव्या गड्यासाठी अभेद्य 41 धावांची भागिदारी करत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. मॅकब्रिनेने 82 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 55 तर अॅडेरने 38 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 24 धावा जमविल्या. झिंबाब्वेतर्फे एन्गरेव्हाने 53 धावांत 4 तर मुझारबनीने 52 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक - झिंबाब्वे प. डाव 71.3 षटकात सर्व बाद 210, आयर्लंड प. डाव 58.3 षटकात सर्व बाद 250, झिंबाब्वे दु. डाव 71 षटकात सर्व बाद 197 (मेयर्स 57, विल्यम्स 40, गुंबे 24, अवांतर 16, मॅकब्राईन 4-38, अॅडेर 2-42, यंग 2-37, मॅकार्थी आणि हम्फ्रेस प्रत्येकी 1 बळी), आयर्लंड दु. डाव 36.1 षटकात 6 बाद 158 (टकेर 56, मॅकब्राईन नाबाद 55, अॅडेर नाबाद 24, एन्गरेव्हा 4-53, मुझारबनी 2-52).