इरेडा 4,500 कोटी रुपये उभारणार
समभाग 10 टक्क्यांनी तेजीत : कंपनी अक्षय ऊर्जा क्षेत्रांच्या वित्तपुरवठ्यात गुंतलेली
वृत्तसंस्था/मुंबई
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (इरेडा) चे समभाग जवळपास 10 टक्क्यांवर वधारलेले आहेत. कंपनी क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, राइट्स इश्यू किंवा इतर कोणत्याही माध्यमातून 4,500 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. या वृत्तानंतर समभागात तेजी आली आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी गुरुवार, 29 ऑगस्ट रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे, असे इरेडाने सांगितले. दुपारी 12 वाजता, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर इरेडाचे समभाग जवळपास 10 टक्क्यांनी वाढून 263 रुपयांवर गेले. सहा महिन्यांत ते दुप्पट झाले आहेत.
इरेडाने 32 रुपयांना समभाग विकले
इरेडाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या आयपीओमध्ये 32 रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स विकले होते. समभाग इश्यू किमतीच्या 56.25 टक्क्यांवर प्रीमियमवर सूचीबद्ध झाले. जुलैमध्ये स्टॉकने 310 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
‘नवरत्न’ दर्जा मिळाल्यापासून गुंतवणूकदार वाढले
इरेडा स्टॉकला ‘नवरत्न’ दर्जा मिळाल्यापासून गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. याशिवाय, सरकारने अक्षय ऊर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्यामुळे कंपनीचा समभाग वाढताना दिसतो आहे. इरेडा ही नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी आहे.
निव्वळ नफा 383.69 कोटीवर
इरेडाने नुकतेच जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने या तिमाहीत निव्वळ नफ्यात 30 टक्के वर्षाच्या आधारावर वाढ नोंदवली आहे. कंपनीचा निव्वळ नफा 383.69 कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वीच्या याच तिमाहीत इरेडाचा निव्वळ नफा 294.58 कोटी होता. एप्रिल-जून तिमाहीत ऑपरेशन्समधील महसूल 32 टक्क्यांनी वाढून 1,502 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत महसूल 294.58 रुपये होता. एनबीएफसीच्या मालमत्तेची गुणवत्ता देखील सुधारली आहे.