इराणची वॉररुम सक्रीय, अमेरिकेसोबत युद्धास तयार
सौदी, इजिप्त, तुर्कियेला अराघची यांचा फोन :
वृत्तसंस्था/ तेहरान
अमेरिकेसोबत संघर्षाच्या शक्यतेदरम्यान इराणने स्वत:च्या सैन्य आणि कूटनीतिक दोन्ही आघाड्यांवर सक्रीयता वाढविली आहे. इराण संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि विदेश धोरण समितीला देण्यात आलेल्या ब्रीफिंगमध्ये इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या एअरोस्पेस फोर्सच्या वरिष्ठ कमांडरने इराणचा वॉररुम पूर्णपणे सक्रीय असून देश कुठल्याही क्षणी शत्रूच्या कारवाईला निर्णायक प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचा दावा केला आहे. याचबरोबर इराणचे विदेशमंत्री अब्बास अराघची यांनी तुर्किये, इजिप्त आणि सौदी अरेबियाच्या विदेश मंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली आहे.
तर बैठकीत कमांडरने क्षेत्रीय स्थिती, सैन्य तैनात आणि वर्तमान सुरक्षा स्थितीवर विस्तृत माहिती दिली आहे. संभाव्य संघर्षाला सामोरे जाण्यासाठी सर्व मोहिमात्मक नियोजन तयार असून कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर थेट युद्धक्षेत्रातच दिले जाणार असल्याचे या कमांडरने सांगितले आहे.
इराणने स्वत:च्या शत्रूंवर गुप्तचरविषयक आघाडी मिळविली असून अमेरिका समवेत विरोधी शक्तींच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली जात आहे. अमेरिकेने जर कुठलेही मूर्खतापूर्ण पाऊल उचलले आणि इराणवर हल्ला केला तर अमेरिका स्वत:च एका मोठ्या क्षेत्रीय युद्धात अडकून पडणार आहे. पूर्ण क्षेत्रात असलेले अमेरिकेचे सैन्य आणि आर्थिक हितसंबंध आमच्या ऑपरेशनल पल्ल्यात असल्याचा दावा इराणने केला आहे.
बैठकीत इराणची वर्तमान क्षेपणास्त्र क्षमता आणि आक्रमक सैन्यबळावरही अहवाल सादर करण्यात आला. जून 2025 मध्ये झालेल्या 12 दिवसांच्या युद्धानंतर इराणची सैन्यक्षमता आणखी मजबूत झाली असून ही शक्ती आतापर्यंत दाखविण्यात आली आहे, त्याहून अधिक क्षमता देशाकडे असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
क्षेत्रीय नेत्यांसोबत चर्चा
सैन्यसज्जतेसोबत इराणने कूटनीतिक स्तरावरही हालचालींना वेग दिला अहे. विदेशमंत्री अब्बास अराघची यांनी सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्कियेच्या विदेश मंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली. या चर्चांमध्ये क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थिती, विशेषकरून अमेरिकेची भूमिका आणि संभाव्य धोक्यांवर विचार करण्यात आला आहे. इराण आणि अमेरिकेदरम्यान वाकयुद्ध पेटले असताना या घडामोडी घडत आहेत. यापूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी अमेरिकेकडून सुरु करण्यात आलेले कुठलेही युद्ध पूर्ण क्षेत्राला युद्धाच्या आगीत लोटणार असल्याची धमकी दिली होती.