इराणचे खमेनी पलायनाच्या सज्जतेत ?
प्रशासनाविरोधात भडकली असंतोषाची आग, सर्व घडामोडींवर अमेरिकेचे लक्ष, ट्रंप यांनी दिला इशारा
वृत्तसंस्था / तेहरान (इराण)
इराणमध्ये धर्मसत्तेविरोधात असंतोषाची आग भडकली आहे. त्यामुळे परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर चालल्याचे दिसून येत आहे. या देशाचे सत्ताधीश आणि सर्वेसर्वा अयातोल्ला अली खमेनी हे इराणमधून पलायन करण्यासाठी सज्ज असून, जनतेचा असंतोष आणखी तीव्र झाल्यास ते रशियाला पळून जातील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी खमेनी यांना इशारा दिला असून आंदोलकांना अमेरिकेचे समर्थन असल्याचे स्पष्ट केले आहे.
ब्रिटनच्या काही वृत्तसंस्थांनी इराणमधील या खळबळजनक घडामोडींची माहिती प्रसिद्ध केली आहे. खमेनी हे 86 वर्षांचे असून ते आपल्या 20 नजीकच्या सहकाऱ्यांसह पळून जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांना देशाबाहेर घेऊन जाण्यासाठी काही विमाने सज्ज ठेवण्यात आली आहेत, अशीही माहिती आहे. इराण किंवा अन्य कोणत्याही देशाने या वृत्तांना दुजोरा दिलेला नाही. तथापि, इराणमधील हालचाली अत्यंत वेगवान झाल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.
जनतेचे आंदोलन
इराणची जनता आपल्या प्रशासनाच्या आर्थिक धोरणांना कंटाळली आहे. प्रशासनाच्या नकारात्मक धोरणांमुळे इराणची आर्थिक घसरण वेगाने होत असून लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळणेही कठीण झाले आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात असल्याने उच्चशिशिक्षतांनाही नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे लक्षावधी लोक रस्त्यांवर उतरुन प्रशासनाविरोधात आंदोलने करीत आहेत. धार्मिक नेत्यांना आर्थिक स्थिती हाताळणे कठीण झाले आहे, असा आंदोलकांचा आरोप आहे.
खमेनी यांचा ‘प्लान बी’
अयातोल्ला अली खमेनी हे इराणचे धार्मिक आणि प्रशासकीय प्रमुख आहेत. त्यांनी आंदोलन चेपण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, त्यांना यश आलेले नाही. प्रशासनाच्या दमनचक्राला न जुमानता आंदोलन केले जात आहे. अमेरिकेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवले आहे. आवश्यकता भासल्यास आम्ही हस्तक्षेप करु. खमेनी यांनी आंदोल दाबण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना धडा शिकविला जाईल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. एकंदर रागरंग पाहता खमेनी यांच्या आसनाला धक्के बसत असून परिस्थिती अगदी टोकाला गेल्यास त्यांनी जीव वाचविण्यासाठी देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे 20 अगदी निकटचे सहकारीही त्यांच्यासह देशत्यागाच्या विचारात आहेत. देशत्यागाची सर्व व्यवस्थाही करुन ठेवण्यात आली आहे. कदाचित, येत्या काही दिवसांमध्येच इराणमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुतीन यांची प्रशंसा
खमेनी यांनी नुकतीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रशंसा केली आहे. इराणची संस्कृती ही रशियाच्या संस्कृतीच्या जवळची आहे. त्यामुळे रशियासंबंधी आपल्याला आत्मीयता वाटते, असे त्यांनी स्पष्ट केल्याने त्यांचा कल रशियात स्थलांतर करण्याचा आहे, असे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी सिरीयाचे अध्यक्ष बशर अल् आसद यांनीही देश सोडून रशियाला पलायन केले होते. त्यांचेच अनुकरण अयातोल्ला अली खमेनी हे करतील, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
ट्रंप यांचा इशारा
इराणमध्ये आंदोलकांवर अन्याय झाल्यास अमेरिका स्वस्थ बसणार नाही. आम्हीही सर्व सज्जता ठेवली आहे. कोणत्याही क्षणी निर्णायक पाऊल उचलण्यास आम्ही सज्ज आहोत. इराणच्या सत्ताधीशांनी खेळ खेळणे बंद करावे, असा स्पष्ट आणि गंभीर इशारा अमेरिकेच्या प्रशासनाने इराणच्या सत्ताधीशांना दिलेला आहे.
व्हेनेझुएलानंतर आता इराण लक्ष्य...
ड व्हेनेझुएलातील यशस्वी कार्यवाहीनंतर आता इमेरिकेचे लक्ष्य आहे इराण
ड इराणमधील धर्मसत्तेच्या विरोधात जनतेचे आंदोलन, अमेरिकेकडून पाठिंबा
ड इराणच्या नेत्यांनी खेळ करणे बंद करावे, असा अमेरिकडून गंभीर इशारा