इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे प्रचंड नुकसान
दोन गुप्तचर लष्करी तळ नष्ट, सॅटेलाईट इमेजमधून वास्तव उघड : इस्रायलने एकाच हल्ल्यात इराणचे कंबरडे मोडले
वृत्तसंस्था/तेल अवीव
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान शनिवारी इस्रायलने इराणवर हल्ला केल्याने हा तणाव आणखीनच वाढला आहे. या हल्ल्यात इराणचे चार हवाई संरक्षण सैनिक ठार झाल्याची माहिती रविवारी स्पष्ट झाली. तसेच इस्रायलने आपल्या हल्ल्याद्वारे इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला मोठा धक्का दिल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी घन इंधन तयार केलेल्या अनेक ठिकाणांवर इस्रायली हवाई दलाने हल्ला केला. तसेच शस्त्रास्त्र निर्मिती केंद्रांवरही हल्ले केल्याने प्रचंड नुकसान झाल्याचे वास्तव सॅटेलाईट इमेजमधून स्पष्ट झाले आहे.
इस्रायलने हल्ला केलेले लक्ष्य अत्याधुनिक उपकरणे हे होते. तसेच शस्त्रागारांवरही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याने नुकसान झाल्याचे समजते. प्रत्यक्षात इराण मोठे नुकसान झाल्याचा दावा फेटाळून लावत आहे. इस्रायलने डागलेली अनेक क्षेपणास्त्रे आपण हवेतच नष्ट केल्याचे इराणने म्हटले आहे. पण, मोक्मयाच्या ठिकाणी असलेल्या चार एस-300 एअर डिफेन्स केंद्रांवर हल्ला करण्यात आल्याचे इस्रायली सूत्रांनी सांगितले. या केंद्रांच्या माध्यमातून इराणच्या अणु आणि ऊर्जा सुविधांचे संरक्षण केले जाते. ड्रोन निर्मिती कारखाना आणि पारचिन लष्करी संकुलातील एका सुविधेवरही हल्ला करण्यात आला. अहवालानुसार, बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. एका अधिकाऱ्याने हा कारखाना म्हणजे इराणी सैन्याचा कणा असल्याचे म्हटले आहे. या केंद्रांमधील सुमारे 20 उपकरणे नष्ट झाली असून प्रत्येकाची किंमत 8 ते 16 कोटी ऊपये आहे.
नेतान्याहू-खामेनींमध्ये शाब्दिक संघर्ष
इराणवरील हल्ल्यांबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी वक्तव्य केले आहे. इस्रायली हल्ल्यामुळे इराणचे भरपूर नुकसान झाले आहे. तसेच या हल्ल्याच्या माध्यमातून आपले सर्व लक्ष्य साध्य झाल्याचा दावाही त्यांनी केला. याचदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनीही रविवारी पहिल्यांदाच भाष्य केले. इस्रायलने हल्ल्यातील नुकसानीबाबत अतिशयोक्तीपूर्ण माहिती देऊ नये, असा इशारा त्यांनी दिला. तसेच इराणी लोकांना सतर्क करताना त्यांनी ‘तऊणांची ताकद इस्रायलला समजावून सांगणे आवश्यक आहे’ असे सूचक वक्तव्य केले. देशातील तरुण इराणी लोकांचा संदेश इस्रायलपर्यंत कसा पोहोचवतात हे अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे. भविष्यात देशाच्या हितार्थ योग्य पावले उचलावी लागतील, असेही खामेनी पुढे म्हणाले.