For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणचे परराष्ट्रमंत्री पुन्हा पाकिस्तानात

06:04 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणचे परराष्ट्रमंत्री पुन्हा पाकिस्तानात
Advertisement

दोन दिवसांतील दुसरा दौरा, पाकिस्तानमधून रशियाला रवाना होण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान, इस्लामाबाद

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पुन्हा एकदा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे दाखल झाले आहेत. दोन दिवसांतील हा त्यांचा दुसरा दौरा आहे. या दौऱ्यात ते पाकिस्तानी नेत्यांची भेट घेणार आहेत. इस्लामाबादमधील वास्तव्यानंतर अराघची रशियासाठी रवाना होतील असे सांगितले जात आहे. यापूर्वी शनिवारी अराघची यांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी इराणच्या अटी आणि अमेरिकेच्या असलेल्या मागण्यांवर आपला आक्षेप पाकिस्तानकडे नोंदवला होता.

Advertisement

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कायम असून शांतता चर्चेसाठी पाकिस्तानकडून प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा होत नसल्यामुळे अद्याप कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही. अमेरिकेशी थेट वाटाघाटी करणार नाहीत आणि आपली भूमिका पाकिस्तानमार्फत मांडली जाईल, असे इराणने स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर अराघची शनिवारी संध्याकाळी पाकिस्तान भेटीनंतर ओमानसाठी रवाना झाले. रविवारी त्यांनी ओमानचे सुलतान तारिक बिन हैथम यांची भेट घेतली. यावेळी युद्ध आणि शांततेच्या प्रयत्नांवर चर्चा झाल्याचे समजते. आता ओमानमधून ते पुन्हा पाकिस्तानात पोहोचले असून रशियालाही जाणार असल्याचे समजते.

इस्लामाबाद-मस्कत-इस्लामाबाद

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची ओमानची राजधानी मस्कत येथून रविवारी सायंकाळी पाकिस्तानला रवाना झाले. इस्लामाबादमध्ये दाखल झाल्यावर अराघची दुसऱ्यांदा पाकिस्तानी नेत्यांना भेटतील. मिळालेल्या माहितीनुसार, चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर तेहरानला परतलेले त्यांचे पथक आता इस्लामाबादमध्ये त्यांच्यासोबत सामील होईल. इस्लामाबादमधील अल्प मुक्कामानंतर अराघची मॉस्कोसाठी रवाना होतील.

ओमानच्या सुलतानांसमवेत युद्ध-शांततेवर चर्चा

अब्बास अराघची यांनी मस्कतमध्ये ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी प्रदेशात सुरू असलेल्या युद्धावर आणि शांततेच्या प्रयत्नांवर चर्चा केली. अराघची यांनी ओमानच्या राजनैतिक भूमिकेची प्रशंसा केली. केवळ संवादातूनच तोडगा शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीनंतर युद्ध लवकरच संपेल आणि प्रदेशात शांतता परत येईल, अशी आशा ओमानच्या सुलतानांनी व्यक्त केली. तसेच शांततेच्या दिशेने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. या बैठकीला ओमानचे परराष्ट्रमंत्रीही उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.