इराणची हानी छायाचित्रांमधून स्पष्ट
उपग्रहीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुरावे समोर
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेने रविवारी इराणच्या अणुतळांवर केलेल्या हल्ल्यांमुळे इराणची प्रचंड हानी झाल्याचे आता पुराव्यांनी स्पष्ट झाले आहे. उपग्रहांनी अमेरिकेच्या हल्ल्यांच्या आधी आणि हल्ल्यांच्या नंतर असलेली या तळांची स्थिती स्पष्ट करणारी छायाचित्रे पाठविली आहेत. अमेरिकेने या हल्ल्यांच्या नंतर केलेल्या प्रतिपादनाच्याहीपेक्षा मोठी हानी या हल्ल्यांमध्ये झाल्याचे या छायाचित्रांमुळे स्पष्ट होत आहे.
फोर्डो येथे अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांची अत्यंत स्पष्ट छायाचित्रे उपलब्ध आहेत. त्यांच्या माध्यमातून डोंगरांना पडलेली भोके स्पष्ट दिसत आहेत. या भोकांमधून अमेरिकेच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी इराणच्या भूमीगत अणुकेंद्रांना लक्ष्य केले होते. या तळांची झालेली हानीही स्पष्ट दिसून येत आहे. अमेरिकेने या हल्ल्यांसाठी आपले सर्वात प्रबळ बाँब उपयोगात आणले होते. इराणने सुरक्षेसाठी आपले अणुतळ डोंगरांच्या पायथ्याशी भूमीच्या खाली 80 ते 100 मीटरवर निर्माण केले होते. त्यामुळे अमरिकेने ही खोली भेदणारे बाँब उपयोगात आणले होते. या बाँबनी त्यांची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे, असे या छायाचित्रांमधून दिसून येत आहे. अमेरिकेची क्षेपणास्त्रे आत गेली असल्याचे स्पष्ट दिसून येते. मात्र, या अणुतळांना हवेचा पुरवठा करणारी इमारत सुस्थितीत आहे. तसेच भूमिगत अणुतळांमध्ये असलेल्या युरेनियमच्या साठ्यांचे नेमके काय झाले, हे स्पष्ट झालेले नाही. यासंबंधीची माहिती येत्या काही दिवसात बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, या अणुकेंद्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी असलेल्या भुयारांची हानी झाल्याचे छायाचित्रांमधून स्पष्ट होत आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार आता हे तळ निकामी झाल्याने ते उपयोग करण्याच्या योग्यतेचे राहिलेले नाहीत. इराणने या म्हणण्याचा इन्कार केला आहे.
नतान्झचीही हानी
नतान्झ हा इराणचा आणखी एक महत्वाचा भूमिगत तळ आहे. या तळाचे वरचे छत तुटल्याचे छायाचित्रांमधून दिसून येते. तथापि, क्षेपणास्त्रे या छतातून आत गेली की नाही, हे स्पष्ट होत नाही. तसेच आत त्यांचा स्फोट झाला असेल, तर नेमकी किती हानी झाली, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. या तळांमध्ये नेमके किती युरेनियम होते आणि त्यातील किती संपृक्त झालेले होते, हेही सध्या स्पष्ट झालेले नाही. पण अमेरिकेचा उद्देश साध्य झालेला आहे, हे स्पष्ट होत आहे.