इराणचे मंत्री अराघची यांना डच्चू ?
अध्यक्षांच्या आदेशाविरुद्ध वर्तनाचा फटका बसणार
वृत्तसंस्था / तेहरान
इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे, अशी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेस्कियान आणि इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागर घालिबाफ यांची इच्छा आहे, असे वृत्त आहे. सध्या इराणवर अनधिकृत वर्चस्व गाजविणाऱ्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड कोर्प्स’ (आयआरजीसी) या संस्थेच्या आहारी अराघची गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेशी चर्चा करण्यासंबंधीच्या प्रयत्नांमध्ये अडथळे येत आहेत. ही संस्था अतिरेकी असून ती अमेरिकेच्या विरोधात आहे. त्यामुळे अराघची यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, असे या दोन्ही नेत्यांचे मत आहे. तथापि, यामुळे इराण चालविण्याचे उत्तरदायित्व ज्यांच्यावर आहे, त्या तीन सत्ताकेंद्रांमध्ये बेबनाव निर्माण झाल्याची स्थिती समोर आली आहे.
गेल्या दोन आठवड्यांमध्ये अमेरिकेशी इराणच्या अणुकार्यक्रमासंबंधात जी चर्चा केली गेली, तिची माहिती योग्य प्रकारे अराघची यांनी अध्यक्ष पेझेस्कियान यांना दिली नाही, असा आरोप आहे. आयआरजीसी या संस्थेचा पेझेस्कियान आणि घालीबाफ यांना विरोध आहे. ही संस्था अमेरिकेशी तणाव वाढविण्यासाठी कारणीभूत आहे, अशी इराणच्या नेतृत्वाची समजूत आहे. अराघची हे इराणच्या नेतृत्वाचे न ऐकता आयआरजीही या संस्थेचा शब्द प्रमाण मानत असल्याचे अमेरिकेशी होणारी चर्चा पुढे न जाता अडकली आहे. त्यामुळे अराघची यांना मंत्रिमंडळातून काढले जावे, यासाठी आता इराणमध्ये हालचाली केल्या जात आहेत.
नेतृत्व गटांमध्ये बेबनाव
सध्या इराणमध्ये तीन सत्ताकेंद्रे असून त्यांची तोंडे तीन दिशांना आहेत. अध्यक्ष पेझेस्कियान हे एक सत्ताकेंद्र असून दुसरे बळकट सत्ताकेंद्र आयआरजीसी ही संस्था आहे. तिसरे सत्ताकेंद्र इराणच्या संसदेचे अध्यक्ष घालीबाफ हे आहे. आयआरजीसी ही संस्था सेनासदृश असून इराणच्या शस्त्रसाठ्यावर तिचे नियंत्रण असल्याची माहिती दिली जाते. इतर दोन सत्ताकेंद्रे मात्र नागरी आहेत. आयआरजीसीच्या हाती शस्त्रबळ असल्याने नागरी नेत्यांना ती जुमानत नाही. पाकिस्तानात जी चर्चेची फेरी अयशस्वी झाली, त्या घटनेला ही संस्था उत्तरदायी आहे, असे मानले जात आहे. त्यामुळे या संस्थेवरही आता लगाम कसण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती इराणच्या वृत्तपत्रांमध्ये देण्यात आली आहे.
शिष्टमंडळाला रोखले
इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात चर्चेसाठी गेले असताना, आयआरजीसी या संस्थेचे नेते अहमद वहीदी आणि अली अब्दुल्लाही यांनी या शिष्टमंडळाच्या चर्चेत अडथळे निर्माण केले. इराणने अणुबाँब बनविण्याचा कार्यक्रम सोडून द्यावा, ही अमेरिकेची अट आहे. या अटीसंदर्भात अमेरिकेशी थेट चर्चा करण्याची इराणच्या शिष्टमंडळाची इच्छा होती. मात्र, आयआरजीसीने शिष्टमंडळाला तसे करु दिले नाही. यावेळी इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अराघची यांनी आयआरजीसीच्या इच्छेनुसार वर्तन केले, असा अध्यक्ष पेझेस्कियान यांचा आरोप आहे. त्यामुळे आता इराणच्या नेतृत्वातील वादच मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसून येत आहेत.