भारताबद्दल इराणच्या राजदूताचे वादग्रस्त वक्तव्य
भारत सरकारने इराणला कुठलीच मदत केली नसल्याचा दावा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानातील इराणचे राजदूत रजा अमीरी मोघद्दम यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षादरम्यान पाकिस्तानच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले, तर भारतासंबंधी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. या संघर्षादरम्यान भारत सरकारने इराणला कुठलीच मदत केली नाही. भारत सरकार आणि इस्रायल यांच्यात घनिष्ठ मैत्री असून भारत अमेरिकेच्या प्रभावाखाली असतो. परंतु भारताची जनता विशेषकरून मुस्लीम आणि राजकीय पक्षांकडून इस्रायलच्या हल्ल्याची निंदा करण्यात आल्याचे मोघद्दम यांनी म्हटले आहे. तर यापूर्वी इराणच्या भारतातील दूतावासाने भारतीय जनता, राजकीय पक्ष आणि संस्थांचे आभार मानले होते.
इस्रायलसोबत झालेल्या संघर्षादरम्यान भारत सरकारने कुठलीच मदत केली नाही. भारत सरकारने स्वत:ला तटस्थ दाखविण्याचा प्रयत्न केला. भारताने आमच्या बाजूने मतदानही केले नाही. भारताचे इस्रायलसोबत घनिष्ठ संबंध आहेत. या भागात भारत हा अमेरिकेच्या आघाडीत सामील आहे. पाकिस्तान आणि इस्लामिक देशांची संघटना ओआयसीने मात्र इस्रायलच्या हल्ल्यांची निंदा केल्याचा दावा इराणचे पाकिस्तानातील राजदूत रजा अमीरी यांनी केला आहे.
यापूर्वी इराणच्या भारतातील दूतावासाने एक वक्तव्य जारी करत भारताची स्वातंत्र्यप्रिय जनता, राजकीय पक्ष, संस्था आणि अन्य लोकांचे आभार मानले होते. या वक्तव्यात भारत सरकारचा उल्लेख नव्हता. भारत सरकारने युद्धादरम्यान इराण आणि इस्रायलला शांततेचे आवाहन केले होते. परंतु भारताने शांघाय सहकार्य संघटनेच्या अंतर्गत इस्रायलवर टीका करणाऱ्या वक्तव्यापासून स्वत:ला वेगळे केले होते. इराणच्या पाकिस्तानातील राजदूताने याचाच अप्रत्यक्ष उल्लेख केल्याचे मानले जातेय.