इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही !
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची कठोर भूमिका
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
‘आम्ही आपल्याला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणला दिला आहे. या संदर्भात त्यांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातोल्ला अली खमेनी यांना पत्र पाठविले असून चर्चा करण्यास संमत असल्याचे काळविले आहे. अद्याप खमेनी यांनी हे पत्र मिळाल्याचे स्पष्ट केलेले नाही. तथापि, त्यामुळे इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तसेच, इराणने चर्चेचा प्रस्ताव धुडकावला, तर अमेरिका कोणती भूमिका घेणार याकडे जग अतिशय औत्सुक्याने पहात आहे.
इराण आपल्या अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रम वेगाने पुढे नेत आहे, असा आंतरराष्ट्रीय तज्ञांचा संशय आहे. ट्रंप यांनाही याची कल्पना आहे. काही तज्ञांच्या मते इराण आता अण्वस्त्र निर्मितीपासून केवळ एक ते दोन आठवडे दूर असून कोणत्याही क्षणी तो अण्वस्त्रधारी झाल्याची घोषणाही करु शकतो. तथापि, काही तज्ञांच्या मते इराणला डागण्याजोगे अण्वस्त्र बनविण्यासाठी अद्याप काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. इराणच्या या कार्यक्रमाला अमेरिका कसे रोखणार हा महत्वाचा प्रश्न असल्याचा अभिप्राय या क्षेत्रात व्यक्त होत आहे.
चर्चा इराणसाठी महत्वाची
अण्वस्त्र कार्यक्रम रोखणे आणि त्यासंबधी अमेरिकेशी चर्चा करणे, हे इराणच्याच हिताच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असे ट्रंप यांनी खमेनी यांना कळविले आहे. जर इराणने योग्य तो प्रतिसाद दिला नाही, तर मात्र, अमेरिकेला ‘काहीतरी’ करावे लागेल, हे निश्चित आहे. कारण आम्ही त्याना अण्वस्त्रनिर्मिती करु देऊ शकत नाही, अशी स्पष्टोक्ती ट्रंप यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना केली.
इराणची उलटसुलट वक्तव्ये
अणुकार्यक्रमासंबंधी इराणने नेहमीच उलटसुलट वक्तव्ये केली आहेत. हा कार्यक्रम शांततापूर्णं ऊर्जा उत्पादनासाठी आहे, ही इराणची अधिकृत भूमिका असली, तरी इराणच्या प्रशासनातील अनेक अधिकारी नेहमी अणुबाँब बनविण्याची धमकी देत असतात. त्यामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण होतो. इराणच्या अणुकार्यक्रमाचा सर्वात मोठा धोका इस्रायलला आहे. त्यामुळे इस्रायल नेहमी यासंबंधात सजग असतो. आता हा मुद्दा पुन्हा प्रकाशात आल्याने जग सावधपणे याकडे पहात आहे.