भारतीय नर्स निमिषाप्रकरणी इराण करणार हस्तक्षेप
तेहरान : येमेनमध्ये मृत्युदंड ठोठावण्यात आलेली भारतीय नर्स निमिषा प्रियासंबंधी इराण सरकारने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. इराण याप्रकरणी येमेनच्या सरकारसोबत चर्चा करणार आहे. निमिषाला मृत्युदंडापासून वाचविण्यासाठी शक्य ती सर्व मदत करणार असल्याचे इराण सरकारने म्हटले आहे. येमेनचे अध्यक्ष मोहम्मद अल-अलीमी यांनी दोन दिवसांपूर्वीच तुरुंगात कैद निमिषा प्रियाच्या मृत्युदंडाला मंजुरी दिली होती. येमेनच्या न्यायालयाने भारतीय नर्स निमिषाला हत्येप्रकरणी दोषी ठरवत मृत्युदंड ठोठावला होता, यावर तेथील अध्यक्षांनी मोहोर उमटविली होती. निमिषा 2017 पासून येमेनच्या तुरुंगात कैद आहे. निमिषाला येमेनचे नागरिक तलाल एब्दो महदीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. महदीच्या ताब्यात असलेला स्वत:चा पासपोर्ट परत मिळविण्यासाठी निमिषाने त्यांना गुंगीचे इंजेक्शन दिले होते, परंतु या इंजेक्शनमुळे महदीचा मृत्यू झाला होता. केरळच्या पलक्कडची रहिवासी असलेली निमिषा स्वत:चा पती आणि मुलीसोबत मागील एक दशकापासून येमेनमध्ये काम करत होती. 2016 मध्ये येमेन या देशात गृहयुद्ध सुरू झाल्यामुळे तेथून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. तर त्यापूर्वीच 2014 मध्येच तिचे पती आणि मुलगी भारतात परतले होते. परंतु निमिषाला भारतात परतता आले नव्हते. यानंतर निमिषावर जुलै 2017 मध्ये येमेनी नागरिकाच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता.