"मुघल बादशाहाच्या इराणी पत्नीसाठी"....इराणने ताजमहल जवळच्या फोटोवरुन अमेरिकी परराष्ट्र सचिवांना डिवचलं
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो त्यांच्या भारत दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी आग्रा येथे दाखल झाले, जिथे त्यांनी जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालला भेट दिली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जेनेट डी. रुबियो, अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट गॅब्रिएल आणि भारतातील अमेरिकी दूतावासाचे वरिष्ठ अधिकारी होते. रुबियो यांनी ताजमहाल संकुलाचा दौरा केला आणि तेथील ऐतिहासिक वास्तुकलेचे बारकाईने निरीक्षण केले.
दरम्यान, हैदराबादमधील इराणी वाणिज्य दूतावासाने आपल्या अधिकृत खात्यावर एक पोस्ट शेअर करून नवीन वाद निर्माण केला आहे. त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर मार्को रुबियो यांना इतिहास आणि वास्तुकलेची समज असती, तर ते कदाचित येथे फोटो काढायला आले नसते. त्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ताजमहाल एका मुघल सम्राटाच्या इराणी पत्नीवरील प्रेमापोटी बांधला गेला होता आणि त्याच्या वास्तुकलेत इराणी कलाकारांनी मोठी भूमिका बजावली होती, तर आज अमेरिकी सरकार इराणी संस्कृतीला लक्ष्य करत आहे.
इराणच्या दूतावासाच्या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. काहींनी याचा संबंध सांस्कृतिक वारसा आणि राजनैतिकतेशी जोडला, तर इतरांनी अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर याला एक राजकीय संदेश म्हणून पाहिले. मार्को रुबियो यांच्या ताजमहाल भेटीमुळे आणि त्यावरील प्रतिक्रियेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सांस्कृतिक वारसा यावर एक नवीन चर्चा सुरू झाली आहे.
मार्को रुबिया यांचा दौरा
मार्को रुबियो चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर भारतात आले आहेत. त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात कोलकाता येथून केली आणि त्यानंतर ते दिल्लीला परतले, जिथे त्यांचा कार्यक्रम व्यस्त होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. रविवारी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत झालेली त्यांची द्विपक्षीय चर्चा अत्यंत यशस्वी ठरली.
आग्र्याला भेट
तिसऱ्या दिवशी, आग्रा नंतर ते राजस्थानला गेले. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आमेर पॅलेसला भेट दिली, जिथे त्यांना राजस्थानच्या संस्कृती आणि वारशाची ओळख झाली. त्यांच्या भेटीमुळे, आमेर पॅलेस दुपारी १:०० ते सायंकाळी ५:०० पर्यंत सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. रुबियो दुपारी सुमारे १:३० वाजता आग्रा येथून एका विशेष विमानाने जयपूर विमानतळावर पोहोचले.
सोमवारी जयपूरमध्ये संपूर्ण दिवस घालवल्यानंतर, ते मंगळवारी सकाळी दिल्लीसाठी रवाना होतील. तिथे ते क्वाड बैठकीत सहभागी होतील. व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि सामरिक बाबींमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करणे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.