For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायलच्या भीतीपोटी इराणची रशियाला साद

06:51 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्रायलच्या भीतीपोटी इराणची रशियाला साद
Advertisement

महाशक्तिशाली एस-400 यंत्रणेची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान

इस्रायल आणि इराण यांच्यात थेट युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचदरम्यान इराणने रशियाकडून महाशक्तिशाली हवाई सुरक्षा आणि रडार यंत्रणेची मागणी केली आहे. एस-400 या यंत्रणेला जगातील शक्तिशाली हवाई सुरक्षा यंत्रणा मानण्यात येते.

Advertisement

इराणने रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगू यांच्या दौऱ्यानंतर रक्षा प्रणालींबाबत विनंती केली आहे. आम्ही विविध क्षेत्रांमध्ये इराणसोबत पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत असे शोइगू यांनी म्हटले आहे. मागील आठवड्यात तेहरानमध्ये हमासचे राजकीय प्रमुख इस्माइल हानियेह यांची हत्या झाल्यावर इराणने इस्रायलच्या विरोधात प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याची धमकी दिली आहे.

रशिया स्वत:च्या आर्थिक संकटाला सामोरा जात आहे. तसेच रशियाचे इस्रायलसोबत आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत, तरीही रशिया इराणच्या मदतीच्या विनंतीला नाकारू शकत नाही. यामागील कारण युक्रेन युद्ध आहे. या युद्धामुळे रशिया आता इराणकडून निर्मित ड्रोनवर अधिक निर्भर झाला आहे.

एप्रिल महिन्यात इराणच्या हल्ल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी इस्रायलला पाठिंबा दर्शविला होता, परंतु रशियाने तेव्हा इराणची साथ दिली होती. मॉस्को-तेहरान संबंध हे युक्रेनमधील रशियाच्या आक्रमणाची स्थिती तसेच इराणी शस्त्रास्त्रांवरील रशियाच्या निर्भरतेमुळे दृढ होत चालले आहेत. इस्रायलवर हल्ला करण्याची तयारी  करत असताना इराणने रशियाकडून एस-400 यंत्रणेची मागणी केली आहे. तर इस्रायलने देखील इराणला हल्ला झाल्यास मोठी किंमत मोजावी लागणार असल्याची धमकी दिली आहे.

पुतीन यांच्या निकटवर्तीयाचा दौरा

इराणकडून इस्रायलला धमकी देण्यात आल्यावर रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगू यांनी तातडीने इराणचा दौरा केला आहे. शोइगू यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. शोइगू हे यापूर्वी रशियाचे संरक्षणमंत्री होते. पुतीन यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या शोइगू यांना मे महिन्यात रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव करण्यात आले होते. रशियाकडून एस-400 यंत्रणा मिळाल्यास इराणवर हवाई हल्ला करणे इस्रायलला अवघड ठरणार आहे. एस-400 ही यंत्रणा भारताकडे देखील आहे.

Advertisement
Tags :

.