इराणने नाकारली पाकिस्तानची मध्यस्थी
पाकिस्तानातील चर्चेशी संबंध नाही : इराणचा दावा
वृत्तसंस्था / तेहरान
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव इराणने धुडकावला आहे. पाकिस्तानात रविवारी ईजिप्त, तुर्किये आणि पाकिस्तानच्या काही नेत्यांनी एकत्र येऊन हे युद्ध थांबविण्यासंबंधी चर्चा केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. तथापि, या बैठकीत इराण, इस्रायल आणि अमेरिकेचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. या बैठकीत झालेल्या चर्चेशी आपला कोणताही संबंध नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेशी आपल्या देशाची कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. पाकिस्तानने मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. तथापि, पाकिस्तानची या संदर्भात कोणतीही भूमिका असू शकत नाही. इराणचा कोणताही प्रतिनिधी पाकिस्तानात चर्चेसाठी जाणार नाही. पाकिस्तान हे शांतता चर्चेचे स्थळ असू शकत नाही, अशी स्पष्टोक्ती इराणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
इराणची भूमिका महत्वाची
मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची कितीही इच्छा असली, तरी इराणच्या प्रतिसादाशिवाय ती पूर्ण होणे शक्य नाही, हे स्पष्ट होत आहे. या युद्धात पाकिस्तान छुप्या मार्गाने अमेरिकेला साहाय्य करत आहे आणि वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत आहे, असा इराणचा आरोप आहे. बंद दरवाजाआड युद्ध थांबविण्यासंबंधी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृतरित्या केली जात आहे. तथापि, अद्याप कोणताही तोडगा स्पष्टपणे निघालेला नाही. ही चर्चा अयशस्वी होऊ शकते, अशी स्पष्टोक्ती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केली आहे. लवकरच करार झाला नाही, तर अमेरिका इराणच्या वीजनिर्मिती केंद्रांवर हल्ले करुन ती बंद पाडेल आणि इराणच्या तेलविहिरींवर हल्ला करुन त्याही निकामी करण्यात येतील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. अमेरिकेनेही पाकिस्तानच्या भरवशावर राहणे नाकारले आहे, हे दिसून येते. त्यामुळे, मध्यस्थी करण्याचा पाकिस्तानचा दावा हा केवळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे, हे देखील आता स्पष्ट झाले आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.