For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणने फेटाळला अल्टिमेटम

06:48 AM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणने फेटाळला अल्टिमेटम
Advertisement

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यास नकार : ट्रम्प यांनी दिली होती 48 तासांची मुदत

Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी ट्रम्प यांनी दिलेला 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला आहे. अमेरिका असहाय्यता आणि घबराटीतून वारंवार धमक्या देत असल्याचे इराणी लष्कराने म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी किंवा तडजोड करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. वेळ निघून जात आहे आणि असे न केल्यास इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून ते नष्ट केले जातील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

Advertisement

इराणच्या केंद्रीय लष्करी कमांडने ट्रम्प यांच्या इशाऱ्याला स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. इराणने ट्रम्प यांच्या अल्टिमेटमला ‘बालिश’ असे म्हटले आहे. इराणने केवळ या धमकीकडे दुर्लक्ष केले नाही, तर अमेरिकेला गंभीर परिणामांचा इशाराही दिला आहे. खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाने जारी केलेल्या निवेदनात, इराणी जनरल अली अब्दुल्लाही अलीआबादी यांनी ट्रम्प यांच्या इशाऱ्याला ‘असहाय्य, घाबरलेला, असंतुलित आणि मूर्खपणाचा’ असेही संबोधले आहे.

इराणमध्ये जगातील सर्वात मोठा इंटरनेट शटडाउन

इराणमधील इंटरनेट शटडाउन हा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ब्लॅकआउट ठरला आहे. अहवालानुसार, देशात 37 दिवस, म्हणजेच 864 तास इंटरनेट बंद आहे. इंटरनेटवर देखरेख ठेवणारी संस्था ‘नेटब्लॉक्स’ने यासंबंधी मतप्रदर्शन करातना कोणत्याही देशातील हा सर्वात मोठा देशव्यापी इंटरनेट शटडाउन असल्याचे म्हटले आहे. अहवालानुसार, इराणने सुरुवातीला जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटी कायम ठेवली होती, परंतु नंतर आंतरराष्ट्रीय नेटवर्कपासून स्वत:ला वेगळे करत राष्ट्रीय नेटवर्कपुरते मर्यादित ठेवले. अमेरिका आणि इस्रायलने सातत्याने हल्ले सुरू केल्यानंतर सरकारने इंटरनेट वापरावर कडक निर्बंध लादले. यापूर्वी, जानेवारीमध्ये आंदोलनांदरम्यान देशात आठवडाभर इंटरनेट बंद होते, परंतु सध्याचे इंटरनेट बंद त्याहूनही जास्त काळ चालले आहे.

इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनमध्ये 7 ठार

दक्षिण लेबनॉनमधील सिडॉन प्रदेशातील काफर हट्टा येथे झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात सात जण ठार झाले. लेबनॉनच्या अधिकृत राष्ट्रीय वृत्तसंस्थेनुसार, मृतांमध्ये एका 4 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. इस्रायलने राजधानी बेरूतसह दक्षिण लेबनॉनमधील अनेक भागांवर बॉम्बहल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्यात रुपांतरित झालेल्या इमारतींची अनेक छायाचित्रे समोर आली आहेत. या हल्ल्यांच्या माध्यमातून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केले जात असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.