For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चलनदर घटल्याने इराणमध्ये प्रक्षोभ

06:58 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
चलनदर घटल्याने इराणमध्ये प्रक्षोभ
Advertisement

वृत्तसंस्था / तेहरान (इराण)

Advertisement

इराणच्या चलनाचा दर डॉलरच्या तुलनेत अचानक मोठ्या प्रमाणात घटल्याने जनतेचा प्रचंड प्रक्षोभ उसळला आहे. व्यापाऱ्यांनी देशव्यापी बंदला प्रारंभ केला असून वित्तसंस्थाही बंद आहेत. यामुळे या देशात अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. या प्रक्षोभाची सर्वाधिक झळ इराणची राजधानी तेहरानला सर्वाधिक बसली असून इतर औद्योगिक शहरांपर्यंतही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. इराणच्या चनलाची किंमत इतक्या अल्पावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण्याची ही इतिहासातील प्रथम वेळ आहे, अशीही माहिती या घटनेच्या संदर्भात दिली गेली.

तेहरान शहरात सर्व व्यापाऱ्यांनी अघोषित बंद पाळून या संपामध्ये सहभाग घेतला. शहरातील सर्व दुकाने, कारखाने, व्यापारी संस्था, बँका आणि इतर वित्तसंस्था यांनी चलन घसरणीच्या निषेधार्थ आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. इराण सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे ही परिस्थिती ओढविल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी केल्या. अर्थव्यवस्थेतून धर्ममार्तंडांना काढून टाकल्याशिवाय देशाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार नाही, असे मत संपावर गेलेल्या व्यापाऱ्यांपैकी काही जणांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. अर्थव्यवस्था सांभाळणे हे धार्मिक नेत्यांचे काम नाही. या कामासाठी अर्थतज्ञांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. या संपावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही, असे इराणसरकारच्या ताब्यातील वृत्तसंस्थानी स्पष्ट केले.

Advertisement

सर्वात मोठी निदर्शने

तेहरान आणि इतर शहरांमध्ये सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी प्रचंड मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. सरकारने या मोर्चाला बंदी घातली होती. तरीही मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सरकारवर लोक प्रचंड प्रमाणात संतापले आहेत, याची प्रचीती या मोर्चाच्या भव्यतेतून आली असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

प्रचंड महागाईवाढीचाही निषेध

इराणमध्ये सध्या महगाईने हाहाकार माजवला आहे जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. डिसेंबरमध्ये मागच्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत महागाई दरात तब्बल 42.2 टक्के इतकी वाढ झाली आहे. तर याच वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत हा दर 1.8 टक्क्यांनी वाढला आहे. ही महागाई गरीबांच्या आवाक्याबाहेरील आहे. अन्नधान्यांचे आणि तयार खाद्यपदार्थांचे दर गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 72 टक्के इतके वाढले आहे. तर औषधे आणि इतर वैद्यकीय साधने गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत 50 टक्के अधिक महाग झाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे अतियश हाल होत आहेत, असे दिसून येते.

रियालची किंमत किती...

इराणचे राष्ट्रीय चलन ‘रियाल‘ या नावाने ओळखले जाते. 2015 मध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात अणुसमझोता करार झाला होता, तेव्हा 1 डॉलरची किंमत 32 हजार रियाल इतकी होती. ती आता गेल्या 10 वर्षांमध्ये 1 डॉलरला 14 लाख 20 हजार रियाल इतकी घसरली आहे. सोमवारी ही किंमत 1 डॉलरला 13 लाख 80 हजार रियाल इतकी होती. अर्थव्यवस्थेची ही घसरण थांबविणे आता धार्मिक नेत्यांच्या हाती राहेलेले नाही, अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे.

Advertisement
Tags :

.