इराणकडून तीन उपग्रहांचे प्रक्षेपण, सिमोर्ग रॉकेटचा वापर
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणने रविवारी तीन उपग्रहांना यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित केले आहे. प्रेक्षपणात इराणकडून सिमोर्ग रॉकेटचा यशस्वी वापर करण्यात आला आहे. सिमोर्ग रॉकेटकडून यापूर्वी करण्यात आलेले प्रक्षेपण अयशस्वी ठरले होते.
इराणचे उपग्रह प्रक्षेपण संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाची अवहेलना करणारे आहे. इराणला आण्विक अस्त्र पोहोचविण्यास सक्षम बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांशी निगडित कुठलेच पाऊल न उचलण्याचा निर्देश असल्याचे अमेरिकेकडून म्हटले गेले आहे.
इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंधांची कालमर्यादा ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात आली आहे. उपग्रह प्रक्षेपण वाहनांच्या विकासामुळे इराणसाठी आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित करण्याची कालमर्यादा कमी झाली आहे, कारण यात समान तंत्रज्ञानाचा वापर होतो असे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाकडून म्हटले गेले आहे.
मागील दशकात इराणने अनेक अल्पकालीन उपग्रहांना अंतराळाच्या कक्षेत पाठविले असून 2013 मध्ये एका माकडाला अंतराळात पाठविले होते. डिसेंबर महिन्यात इराणने प्राण्यांना वाहून नेण्यास सक्षम एक कॅप्सूल कक्षेत पाठविले होते. इराण सध्या मानवी मोहिमेची तयारी करत आहे.