For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणची अमेरिकेला कडक शब्दात धमकी

06:17 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणची अमेरिकेला कडक शब्दात धमकी
Advertisement

होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकन सैन्यासाठी स्मशानभूमी बनवण्याचा इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान

इराणचे वरिष्ठ अधिकारी मोहसेन रझाई यांनी अमेरिकेला कडक शब्दात धमकी दिली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकन सैन्यासाठी स्मशानभूमी बनवली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मोहसेन रझाई हे इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्समध्ये माजी कमांडर म्हणून कार्यरत होते. त्यांनी अमेरिकन सैन्याला ‘समुद्री डाकू’ असेही म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर इराणने कोणतीही चूक केली, तर त्याला आणखी हल्ल्यांना सामोरे जावे लागू शकते, असा पलटवार केला आहे.

Advertisement

गेल्या महिन्यात इस्फहानमध्ये अमेरिकन एफ-15ई विमान पाडल्याच्या घटनेचा संदर्भ देत रझाई यांनी त्या विमानांच्या अवशेषांप्रमाणेच अमेरिकन जहाजे आणि सैनिकांचीही तीच गत होऊ शकते, असा इशारा दिला आहे. दोन्ही देशांकडून सध्या इशारे आणि धमक्या दिल्या जात असल्या तरी युद्धस्थिती तूर्तास शांत आहे. कोणतेही हल्ले होत नसले तरी शाब्दिक बाचाबाची वाढताना दिसत आहे.

इराणकडून 14-कलमी प्रस्ताव

इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या 9-कलमी योजनेला प्रत्युत्तर म्हणून हा 14-कलमी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये 30 दिवसांच्या आत सर्व मुद्यांवर तोडगा काढणे, भविष्यातील हल्ल्यांविरुद्ध हमी, प्रदेशातून अमेरिकी सैन्याची माघार, गोठवलेली इराणी मालमत्ता परत मिळवणे, निर्बंध हटवणे आणि युद्ध नुकसान भरपाई या मागण्यांचा समावेश आहे. या प्रस्तावात होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी एक नवीन यंत्रणा तयार करणे, अमेरिकेची नौदल नाकेबंदी संपवणे आणि प्रादेशिक संघर्ष संपुष्टात आणण्याची मागणीही करण्यात आली आहे. अहवालानुसार, करारानंतर अणुकार्यक्रमावर स्वतंत्र वाटाघाटी करण्याचा प्रस्तावही आहे.

ट्रम्प यांचा इराणवर अविश्वास

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नवीन शांतता प्रस्तावाचा आढावा घेण्याची तयारी दर्शवली असली तरी त्याच्या यशाबद्दल शंका व्यक्त केली आहे. इराणला गेल्या 47 वर्षांतील आपल्या कृत्यांची मोठी किंमत अजून चुकवायची आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तेहरानने पाकिस्तानमार्फत अमेरिकेला 14-कलमी प्रस्ताव पाठवला आहे.

दोन महिने उलटले तरीही संघर्ष सुरूच

28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने इराणविरुद्ध युद्ध सुरू करून दोन महिने झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या युद्धाचे वर्णन एक छोटी आणि निर्णायक लढाई असे केले होते, पण आता परिस्थिती उलटलेली दिसत आहे. युद्ध थांबले आहे, पण ते संपलेले नाही. या संघर्षात आतापर्यंत 3,600 हून अधिक इराणी नागरिक मरण पावले आहेत, ज्यात 1,700 हून अधिक नागरिकांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.