इराण-इस्रायल संघर्ष : भारतीय चहा उद्योगाला चिंता
पश्चिम आशियातील निर्यातीवर परिणाम : इराण भारतीय चहाचे प्रमुख केंद्र
वृत्तसंस्था/ मुंबई
भारताची चहाची निर्यात ही इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे संकटात आहे. पश्चिम आशियाई बाजारपेठांमध्ये चांगल्या व्यवसायाची शक्यता दिसत असतानाही भारताच्या चहा उद्योगावर आता संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये जेव्हा इस्रायल-हमास संघर्ष वाढला तेव्हा चहा निर्यातदारांसाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे पश्चिम आशियाई देशांवर, विशेषत: इराणवर होणारा परिणाम होता.
इराण हे परंपरेने भारतीय चहाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. इराणमधून यंदा चांगली मागणी आल्याचे उद्योग सांगतात. इंडियन टी एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंशुमन कनौडिया म्हणाले, ‘गेल्या वर्षी इराणमधील व्यवसाय पेमेंट आव्हानांमुळे प्रभावित झाला होता. पण यावर्षी या व्यवहारात लक्षणीय सुधारणा झाली आहे.’
कलकत्ता टी ट्रेडर्स असोसिएशन (सीटीटीए) च्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये उत्तर भारतात पारंपारिक चहाची सरासरी किंमत 288.77 रुपये प्रति किलो होती, तर 2023 मध्ये त्याची किंमत 217.20 रुपये प्रति किलो होती. त्याच वेळी, दक्षिण भारतात पारंपारिक चहाची सरासरी किंमत 2023 मध्ये 147.35 रुपये प्रति किलोच्या तुलनेत 164.97 रुपये प्रति किलो आहे. एशियन टी कंपनीचे संचालक मोहित अग्रवाल म्हणतात, ‘तणावपूर्ण परिस्थिती कमी झाली नाही, तर मालवाहतुकीचा मार्ग आणि विमा यावरही परिणाम होऊ शकतो.’
निर्यात किती झाली?
टी बोर्ड डेटा दर्शवितो की जानेवारी-जून 2024 मध्ये एकूण निर्यात 12.1 कोटी किलो होती जी 2023 मध्ये याच कालावधीत 9.8 कोटी किलो होती. रशिया आणि पश्चिम आशियामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. इराणची चहाची निर्यात जानेवारी-जून 2024 मध्ये 49.1 लाख किलोग्रॅमपर्यंत वाढलेली दिसली जी जानेवारी-जून 2023 मध्ये 30 लाख किलोग्रॅम इतकी होती. जानेवारी-जून 2024 मध्ये इराकची निर्यात 2 कोटी किलोग्रॅम इतकी होती, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 1.4 कोटी किलोग्रॅम होती. म्हणजेच मागच्या वर्षाच्या तुलनेत इराण व इराक या देशांना चहाची निर्यात बऱ्यापैकी वाढलेली आहे. पण इराणची स्थिती युद्धजन्यच राहिली तर मात्र भारताच्या निर्यातीवर मर्यादा येऊ शकतात, असे तज्ञांना सुचवावेसे वाटते. आगामी काळातील स्थितीवरच भारताच्या चहाच्या निर्यातीचे चित्र स्पष्ट होणार आहे.