होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग इराणने रोखला
फारसच्या आखातात रोखली अमेरिकेची एंट्री : भारतावरही होणार परिणाम
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर जबरदस्त हल्ला करत पूर्ण मध्यपूर्वेला आगीच्या दरीत लोटले आहे. परंतु या युद्धाचा प्रभाव केवळ मध्यपूर्वेपुरती मर्यादित नाही, तर पूर्ण जगाला याची धग जाणवू लागली आहे. इराणने आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद केल्याने जागतिक व्यापारासाठी संकटाचे ढग दाटून आले आहेत. इराणचा प्रॉक्सी गट येमेनमधील हुती बंडखोरांनी इराणच्या समर्थनार्थ लाल समुद्र आणि इस्रायलशी निगडित जहाजांवर हल्ला करणार असल्याचे सांगितले आहे.
याचदरम्यान इराणचे वरिष्ठ अधिकारी मोहसिन रजाई यांनी आता पर्शियन आखातात अमेरिकेच्या जहाजांसाठी एंट्री बंद करण्यात आल्याची घोषणा केली. अमेरिकेच्या जहाजांना पर्शियन आखातात येण्याची अनुमती दिली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना व्हीएचएफ रेडिओ ट्रान्समिशनद्वारे इशारा दिला आहे. कुठलेच जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकत नाही आणि हे असुरक्षित असल्याचे इशाऱ्यात म्हटले गेले आहे.
आयआरजीच्या इशाऱ्यामुळे होर्मुझच्या उपसागरात जहाजांची वाहतूक 70 टक्क्यांनी कमी झाली असून अनेक टँकर्सने स्वत:चे मार्ग बदलले आहेत. इराण अणि अमेरिका-इस्रायलचे हे युद्ध जागतिक ऊर्जा बाजाराला हादरवू शकते, कारण होर्मुझची सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वपूर्ण तेल आणि गॅस निर्यात मार्ग आहे.
तेल-गॅस व्यापारासाठी महत्त्वपूर्ण
होर्मुझचा उपसागर इराण आणि ओमानदरम्यान स्थित असून तो पर्शियन आखाताला ओमानशी जोडतो. हा अत्यंत चिंचोळा सागरी मार्ग असून त्याची एका ठिकाणी रुंदी केवळ 34 किलोमीटर आहे. हा मार्ग सौदी अरेबिया, इराक, संयुक्त अरब अमिरात आणि कुवैत यासारख्या प्रमुख तेल उत्पादकांसाठी मुख्य निर्यातद्वार आहे. या चिंचोळ्या सागरी मार्गाने दररोज जवळपास 2 कोटी कच्चे बॅरेल तेल आणि रिफाइंड ऑइल जाते, हे प्रमाण जागतिक तेल वापराच्या जवळपास 20 टक्के इतके आहे. जर हा पुरवठा रोखला गेला, तर भारत, चीन सारख्या आशियाच्या मोठ्या अर्थव्यवस्थांवर व्यापर प्रभाव पडणार आहे.
जगावरील परिणाम
होर्मुझच्या उपसागराने मुख्यत्वे ऊर्जेचा व्यापार होतो, याचमुळे याला तेल आणि गॅससाठी जीवनरेषा मानले जाते. एकूण सागरी तेल व्यापाराचे 27 टक्के आणि जागतिक तरल पेट्रोलिय पदार्थांची 25 टक्के वाहतूक याच मार्गाने होते.
एलएनजी : जागतिक एलएनजीचा 20 टक्के व्यापार येथूनच होतो. मुख्यकरून कतार आणि युएई या मार्गाने स्वत:चा एलएनजी जगाला विकतात. या मार्गाने जाणारे 84 टक्के तेल आणि 83 टक्के एलएनजी आशियाई बाजारात (चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया) पोहोचतो.
जर हा मार्ग दीर्घकाळापर्यंत बंद राहिल्यास याचा पर्याय म्हणून सौदी अरेबियाची ईस्ट-वेस्ट पाइपलाइनचा वापर केला जाऊ शकतो. परंतु ही पाइपलाइन केवळ 5 दशलक्ष बॅरल तेल प्रतिदिन हाताळू शकते.
जागतिक तेलबाजारावरील प्रभाव
होर्मुझचा मार्ग बंद करण्याच्या इराणच्या इशाऱ्यानंतर ब्रेंट क्रूडच्या किमती यापूर्वीच 73 डॉलर्सच्या वर पोहोचल्या आहेत, संघर्ष जारी राहिल्यास ही किंमत आणखी 5-10 डॉलर्सने वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात असा अनुमान ब्रिटनमधील बहुराष्ट्रीय बँक बार्कलेजच्या ऊर्जाविषयक तज्ञाने व्यक्त केला आहे.
भारतावरील प्रभाव
होर्मुझचा मार्ग दीर्घकाळ बंद राहिल्यास भारतावर याचा मोठा प्रभाव दिसून येऊ शकतो. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल खरेदीदार असून स्वत:च्या वापराच्या 85 टक्क्यांपेक्षा अधिक कच्च्या तेलासाठी आयातीवर निर्भर आहे. भारताचे जवळपास 50 टक्के क्रूड आयात याच मार्गाने येते. भारत या मार्गाने इराक, सौदी अरेबिया, युएई आणि कुवैतकडून कच्चे तेल आणि गॅस मागवत असतो. अलिकडच्या काळात रशियाकडून कच्चा तेलाची होणारी आयात कमी झाल्याने मध्यपूर्वेवरील भारताची निर्भरता वाढली आहे. याचबरोबर 54 टक्के एलएनजी आयात याच मार्गाने होते.