इराणची विश्व चषक ड्रॉ वर बंदी
वृत्तसंस्था / दुबई
2026 मध्ये होणाऱ्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ पुढील आठवड्यात वाशिंग्टनमध्ये काढण्यात येणार आहे. दरम्यान या ड्रॉवेळी इराणच्या फुटबॉल सदस्यांना अमेरिकेने व्हिसा देण्यास नकार दिल्याने इराणने या ड्रॉ वर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
इराण फुटबॉल फेडरेशनचे प्रवक्ते अमिर अलवी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, क्रीडा क्षेत्राचा विचार करताना इराणच्या अधिकाऱ्यांना व्हिसाचा अडथळा आणला जात आहे. या निर्णयामुळे इराणने विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड्रॉ वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या संदर्भात व्हाईट हाऊसमधून कोणतीही प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.
गेल्या जूनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 देशांच्या नागरिकांवर अमेरिकेचा दौरा करण्यास निर्बंध घातले. यामध्ये इराणचाही समावेश आहे. या यादीमध्ये हैतीचाही समावेश आहे. हैतीने 2026 च्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी आपली पात्रता नुकतीच सिद्ध केली आहे. आगामी विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ 5 डिसेंबर रोजी अमेरिकेतील केनडी सेंटर येथे काढण्यात येणार आहे. सदर स्पर्धा 11 जून ते 19 जुलै दरम्यान अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाने भरविली जात आहे. या स्पर्धेत विक्रमी 48 संघांचा समावेश राहील.