For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेतान्याहूंच्या पुत्राच्या हत्येचा इराणकडून प्रयत्न

06:04 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेतान्याहूंच्या पुत्राच्या हत्येचा इराणकडून प्रयत्न
Advertisement

इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला खुलासा : सुरक्षा ऐषोआरामासाठी नव्हे

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

इराणने माझ्या परिवाराला लक्ष्य केले आणि माझ्या दोनपैकी एका पुत्राची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी एका मुलाखतीत केला आहे. आम्हाला पुरविली जाणारी सुरक्षा काही ऐषोआराम नाही असे नेतान्याहू यांनी राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर बोलताना म्हटले आहे.

Advertisement

नेतान्याहू यांना याइर आणि अवनर हे दोन पुत्र आहेत. परंतु यातील कुणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न इराणने केला होता हे त्यांनी सांगितले नाही. तसेच हत्येचा प्रयत्न कधी करण्यात आला याचाही खुलासा करणे त्यांनी टाळले आहे.

ज्येष्ठ पुत्रामुळे वाद

याइर हे नेतान्याहू यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. याइर हे सोशल मीडियावर स्वत:चे राजकीय मत अन् कट्टर विचारांसाठी चर्चेत असतात. विदेशात असूनही याइर यांना इस्रायली सुरक्षा यंत्रणा शिन बेटची सुरक्षा मिळत राहिल्याने वाद निर्माण झाला होता. एक प्रौढ व्यक्ती विदेशात असताना त्याच्या सुरक्षेचा खर्च इस्रायलचे सरकार का उचलत आहे असा प्रश्न टीकाकारांनी उपस्थित केला होता. 2018-23 दरम्यान याइर, त्यांचा कनिष्ठ बंधू अवनर आणि आई सारा नेतान्याहू यांच्या सुरक्षेवर सुमारे 102.05 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

शीन बेटकडून सुरक्षा

नेतान्याहू यांच्या सुरक्षेतस इस्रायलची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा शीन बेटची मोठी भूमिका आहे. सुरक्षा केवळ नेतान्याहू यांच्यापुरती मर्यादित नाही, तर त्यांचे शासकीय निवासस्थान तसेच खासगी घरांची सुरक्षा देखील केली जाते. नेतान्याहू यांच्या सुरक्षेत व्यक्तिगत सुरक्षा, घराची सुरक्षा अन् खास सुरक्षा व्यवस्थेचे अनेक पदर आहेत. परंतु नेतान्याहू यांच्या पत्नी अन् मुलांसोबत किती सुरक्षा कर्मचारी असतात याची माहिती सार्वजनिक नाही.

निवडणुकीत पराभूत झाले तरीही...

इस्रायलमध्ये पंतप्रधान आणि त्यांच्या परिवाराला सुरक्षा मिळते. परंतु नेतान्याहू यांच्या परिवाराच्या सुरक्षेवरून वाद वाढला आहे, कारण सारा आणि त्यांच्या दोन्ही प्रौढ पुत्रांना दीर्घकाळापर्यंत सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. जुलै महिन्यात मंत्रिस्तरीय समितीने नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा यांना आयुष्यभर सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. तर दोन्ही पुत्रांना कमीतकमी 5 वर्षांपर्यंत सुरक्षा पुरविण्याच निर्णय घेण्यात आला. अवनर हे इस्रायलमध्ये राहतात, तर याइर मागील काही वर्षांमध्ये बहुतांश काळ मियामीमध्ये वास्तव्यास होते.

Advertisement
Tags :

.