कतारमधील अमेरिकन तळावर इराणचा हल्ला
क्षेपणास्त्रांचा मारा : खमेनी यांनी आधीच इशारा दिला होता इशारा : ट्रम्प यांनी बोलावली सुरक्षा समितीची बैठक
वृत्तसंस्था / कतार
मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणने मोठा हल्ला केला. इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद एअरबेस आणि इराकमधील अल असद एअरबेसवर अनेक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. इराणी सैन्याने बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांनाही लक्ष्य केल्याचा दावा केला जात आहे. तथापि, इराणने फक्त कतारमधील अमेरिकन लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर यूएईने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे.
इराणच्या या हल्ल्यानंतर यूएई, कतार, इराक आणि बहरीनने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. हल्ल्याबाबत ओमान, कुवेत आणि बहरीनमध्ये सायरन वाजत आहेत. इराणच्या सैन्याने या हल्ल्यांना ‘ऑपरेशन गुड न्यूज ऑफ व्हिक्टरी‘असे नाव दिले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी आधीच अमेरिकन लष्करी तळावर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. जर अमेरिकेने या युद्धात उडी मारली तर त्यांच्या लष्करी तळांना लक्ष्य केले जाईल, असे इराणने म्हटले होते. तथापि, कतारने एक निवेदन जारी करून इराणने केलेला हल्ला हाणून पाडण्यात आला आहे असे जाहीर केले आहे. दरम्यान, सौदी अरेबियाच्या आकाशात अमेरिकन लढाऊ विमाने उडताना दिसली आहेत.
इराणचा अमेरिकेला इशारा
इराणने प्रथम अमेरिकन प्रशासनाला बदला घेण्याचा इशारा दिला होता, ज्यासाठी अमेरिका आधीच तयार होती. इराणी लष्कराचे नवे प्रमुख मेजर जनरल अमीर हतामी यांनी अमेरिकेला इशारा दिला होता की ते त्यांना कडक उत्तर देतील. अमीर हतामी म्हणाले होते की, आम्ही अमेरिकेचा अनेक वेळा सामना केला आहे. जेव्हा जेव्हा त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कडक उत्तर मिळाले आहे. आमचे अनेक सैनिक शहीद झाले आहेत, परंतु आम्ही पूर्ण ताकदीने आणि धैर्याने लढू, असे स्पष्ट केले आहे.
काही तासांपूर्वी, सीरियामध्ये अमेरिकन तळावर हल्ला झाला. इराणने सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला केला. मेहर न्यूजनुसार, सीरियाच्या पश्चिम हसाका प्रांतातील एका भागात अमेरिकन लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले. इराणने हा हल्ला मोर्टारने केला, त्यानंतर लष्करी तळाच्या प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
भारतीय दूतावास सतर्क
कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर, भारतीय दूतावासाने सूचना जारी केली आहे. भारतीय दूतावासाने तेथे राहणाऱ्या भारतीय समुदायाला सतर्क राहण्याचे आणि घरात राहण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक बातम्या, सूचना आणि मार्गदर्शनाचे पालन करा. ‘आमच्या सोशल मीडिया चॅनेलद्वारे देखील अपडेट्स मिळवत रहा’, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
संपूर्ण जगाचे अमेरिकेकडे लक्ष
इराणने केलेल्या या हल्ल्यानंतर, संपूर्ण जग अमेरिकेच्या पुढील पावलाकडे लक्ष ठेवून आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये लष्करी अधिक्रायांसोबत बैठक घेत आहेत. इराणवर हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी इशारा दिला होता की ‘आता शांतता किंवा दुर्दैव असेल. अजूनही अनेक लक्ष्ये शिल्लक आहेत. जर लवकरच शांतता आली नाही, तर आम्ही इतर लक्ष्यांवर अधिक अचूकतेने हल्ला करू.’ असे ट्रम्प म्हणाले होते.