इराणकडून नव्या राजधानीच्या निर्मितीची घोषणा
वृत्तसंस्था/ तेहरान
भारताचा मित्र अन् पर्शियाच्या आखातातील महत्त्वपूर्ण देश इराण स्वत:ची राजधानी बदलणार आहे. इराणने भविष्यात तेहरान राजधानी नसेल अशी घोषणा केली आहे. तेहरानऐवजी मकरान शहराला नवी राजधानी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेहरानमधील अधिक लोकसंख्या, वीज अन् पाण्याची कमतरता या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी इराणने हे पाऊल उचलले आहे.
इराणच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेले मकरान रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण आहे. यामुळे भारतीय उद्योगांना मध्यपूर्व आणि मध्य आशियातील बाजारपेठांपर्यंत थेट पोहोचता येणार आहे. मध्य आशियात पोहोचण्यासाठी भारत नवे मार्ग शोधत असताना इराणने ही घोषणा केली आहे. हा निर्णय भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही बळ देणार आहे. कॅस्पियन समुद्रातून मकरानपर्यंत पाइपलाइन टाकल्यास परिवहन खर्च कमी होईल आणि यामुळे भारतासाठी स्वस्त अन् अधिक विश्वसनीय पुरवठा सुनिश्चित होणार आहे.
भारत-इराण-तुर्किये कॉरिडॉरसाठी मकरान महत्त्वपूर्ण आहे. हे शहर भारताला थेट युरोपशी जोडते व यात भारत-मध्यपूर्व-युरोप कॉरिडॉर अन् चीनच्या बीआरआयचा पर्याय ठरण्याची क्षमता आहे. यामुळे पारंपरिक सागरी मार्गांवरील निर्भरता कमी होईल आणि जलद अन् सुरक्षित व्यापाराला चालना मिळू शकते. भारताने मकराननजीक चाबहार बंदर विकसित केले आहे.