महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इराण आणि पाकिस्तान

06:30 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास पाठोपाठ आता इराण आणि पाकिस्तान यांच्यात सशस्त्र संघर्ष उद्भवला आहे. बुधवारी इराणने पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात क्षेपणास्त्रे डागली तसेच ड्रोन हल्लेही चढविले. हे हल्ले सुन्नी मुस्लीमांची दहशतवादी संघटना जैश-अल-अद्लच्या ठिकाणांवर होते असा दावा इराणने केला. प्रत्यक्ष इराणमध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटांमध्ये 100 हून अधिक नागरिक ठार झाले होते. या हल्ल्यांची जबाबदारी आयएसआयएसने घेतली होती. तथापि, इराणने या हल्ल्यांसाठी इस्रायलला जबाबदार धरले होते. इराणने पाकिस्तानवर हल्ले केल्यानंतर गुरुवारी पाकिस्ताननेही इराणमध्ये युद्ध विमानांच्या साहाय्याने हल्ले चढवून प्रत्युत्तर दिले. हे हल्ले बलुचिस्तान लिबरेशन संघटनेच्या इराणमधील ठिकाणांवर चढविण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. इराणच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार 3 बालके दगावली आहेत, तर चार बालके जखमी आहेत. तर इराणच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या हल्ल्यात चार बालकांसह 9 जण ठार झाले आहेत. आता या दोन्ही देशांपैकी कोण किती खरे बोलत आहे, हे त्यांचे त्यांनाच माहित. पण त्यांचे दावे खरे मानले तर दोन्ही देशांनी हे हल्ले एकमेकांच्या देशांमधील बालके मारण्यासाठी केले होते की काय असे वाटते. पण महत्त्वाचा मुद्दा असा की हा दोन मुस्लीम देशांमधील संघर्ष आहे आणि त्याला याच धर्मातील शिया-सुन्नी वादाची पार्श्वभूमी आहे. इस्लाममधील शिया-सुन्नी वाद हा या धर्माच्या जवळपास प्रारंभापासूनच असून गेली साधारणत: 1,400 वर्षे तो अव्याहतपणे चालला आहे. असंख्यवेळा या वादाचे पर्यवसान भीषण अशा रक्तपातात झालेले आहे आणि आजही इस्लाममधील हे दोन पंथ संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर हिंसक पद्धतीने सूड उगवतात असे दिसून येते. इराण हा शियापंथीय मुस्लीमांची बहुसंख्या असणारा देश, तर पाकिस्तानात सुन्नी पंथीय बव्हंशी आहेत. तथापि, या दोन देशांमधील वादाचे हेच एक कारण नाही. या वादाला पंथीय वादाप्रमाणे भूराजकीय पार्श्वभूमीही असून तीच कित्येकदा संघर्षाचे महत्त्वाचे कारण ठरते. पाकिस्तानची निर्मिती भारताच्या आधी 1 दिवस, म्हणजे 14 ऑगस्ट 1947 या दिवशी झाली. त्यावेळी पाकिस्तानातील सध्याच्या बलुचिस्तान आणि सरहद्द प्रांत यांना पाकिस्तानात समाविष्ट व्हायचे नव्हते. याच सरहद्द प्रांतातील सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफार खान यांनी आम्हाला पाकिस्तानात घालू नका अशी मागणी ब्रिटीश सरकारकडे केली होती. तसेच भारतातील काँग्रेस नेत्यांकडेही ती मांडली होती. तथापि, यांच्यापैकी कोणीच या मागणीला किंमत न दिल्याने या भूभागाचा समावेश पाकिस्तानमध्ये या भागातील जनतेच्या इच्छेविरुद्ध करण्यात आला होता. तेव्हापासून येथील जनता तिच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानशी संघर्ष करीत आहे. हा संघर्ष बलुचिस्तानात अधिक तीव्र आहे. दुसऱ्या बाजूला इराणने आपल्याशी संलग्न असलेल्या बलुचिस्तानच्या जवळपास एक तृतियांश प्रदेशावर तेव्हापासूनच दावा सांगितला आहे. तसेच सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तानच्या मोठ्या भागावर आजही अफगाणिस्तान आपला दावा सांगतो. यासाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातही अनेकदा रक्तरंजित संघर्ष झालेला आहे. असा संघर्षाचा ‘त्रिकोण’ गेली 78 वर्षे अस्तित्वात आहे. त्यात शिया आणि सुन्नी वादाची ठिणगी पडली की तो भडकतो आणि एकतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान असा संघर्ष तरी पेटतो, किंवा इराण विरुद्ध पाकिस्तान असे तरी स्वरुप प्राप्त होते. यापैकी इराण आणि पाकिस्तान असा संघर्ष कित्येक वर्षे ऐकिवात नव्हता. तो आतून धुमसत होता पण बाहेर उफाळून आला नव्हता. अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान हा संघर्ष मात्र बऱ्याचदा गंभीर स्वरुप धारण करताना दिसून येतो. ही पार्श्वभूमी संक्षिप्त पद्धतीने विशद करण्याचे कारण असे, की सध्या पुन्हा एकदा शिया विरुद्ध सुन्नी हा वाद इराण-पाकिस्तान-अफगाणिस्तान या त्रिकोणात पुन्हा उफाळून आलेला दिसून येतो. त्यामुळे या वादाच्या पाठीवर स्वार होऊन या तीन देशांमधील भूराजकीय वादानेही तोंड वर काढले आहे. हा सर्व प्रकार अनियंत्रित झाल्यास रशिया-युव्रेन, इस्रायल-हमास ही युद्धे अद्याप सुरु असतानाच इराण-पाकिस्तान संघर्षाचे पर्यवसान युद्धात होते किंवा नाही, याकडे भारतासह जगाचे लक्ष लागून राहणार हे निश्चित आहे. कारण आजकालच्या काळात जग ‘जवळ’ आले आहे. या ‘जवळ’ येण्याचा अर्थ जगातील वाद संपण्याच्या मार्गावर आहेत, असा नाही. तर जगातील देश आर्थिकदृष्ट्या एकमेकांवर पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात अवलंबून आहेत, असा आहे. त्यामुळे कोठेही युद्ध सुरु झाले की साऱ्या जगावर त्याचे आर्थिक विपरीत परिणाम होतात. त्यामुळे युद्धे होऊ नयेत, असे सर्वसामान्यांचे मत असते. पण या नव्या संघर्षामुळे आणखी एक प्रश्न निर्माण होतो. आपल्याकडचे तथाकथित पुरोगामी आता कोणाची बाजू घेतील? इस्रायल-हमास युद्ध उभे राहिले, तेव्हा कोणतेही सत्यशोधन न करता डोळे झाकून इस्रायलला शिव्या देणे आणि हमासचीच नैतिक बाजू कशी बरोबर आहे, सांगणे हे परमकर्तव्य बजावले जाते. पण जेव्हा, इराण-पाकिस्तान, पाकिस्तान-अफगाणिस्तान, इराण-इराक, तुर्कस्थान-इराक, इराक-कुवैत, सिरीया-इराक-तुर्कस्थान, सौदी अरेबिया-इराण, सौदी अरेबिया-येमेन असे संघर्ष पेटतात तेव्हा कोणाची बाजू घेणार? कारण ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी स्थिती असते. अशावेळी मग आपल्याकडचे कथित पुरोगामी आपण जणू त्या गावचेच नाही, अशा थाटात तोंडात मिळाची गुळणी धरुन म्हणा किंवा मूग गिळून म्हणा, गप्प बसणेच पसंत करतात. असो. कारण, हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा, आणि विचारसरणीपेक्षाही जास्त प्रवृत्तीचा प्रश्न आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article