For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

इराणकडून भारतीय जहाजांना ‘होर्मुझ’मधून जाण्यास अनुमती

06:24 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणकडून भारतीय जहाजांना ‘होर्मुझ’मधून जाण्यास अनुमती
Advertisement

चीनसह अन्य चार देशांनाही दिलासा 

Advertisement

► वृत्तसंस्था/ तेल अवीव

जवळपास आठ महिन्यांनंतर इराणने भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. आता, भारतीय जहाजे कोणत्याही निर्बंधांशिवाय या मार्गाने प्रवास करू शकतील. इराणने चीन, इराक आणि कतारच्या जहाजांनाही ही सूट दिली आहे. भारत दररोज आयात करत असलेल्या 50 लाख बॅरल कच्च्या तेलापैकी सुमारे 20 लाख बॅरल तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत असल्यामुळे या मार्गावरील अनुमतीमुळे भारताच्या तेल पुरवठ्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Advertisement

होर्मुझ सामुद्रधुनी मार्गावरील जहाज वाहतुकीवर 28 फेब्रुवारीपासून निर्बंध लागू होते. भारत आपल्या एकूण कच्च्या तेलापैकी अंदाजे 40 टक्के तेल याच मार्गाने आयात करतो. इराण वायर आणि अनादोलू एजन्सी या इराणी वृत्त संकेतस्थळांच्या वृत्तानुसार, इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे उपसभापती अहमद हयात-मोगद्दाम यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.

औषधांच्या पुरवठ्यासाठी भारताला सूट

भारतातून औषधे मिळणे सुरू ठेवता येईल, या अपेक्षेने इराणने भारताला ही सूट दिली आहे. तसेच चीन कठीण काळात आपल्याला राजकीय पाठिंबा देईल, अशी आशा इराणला आहे. तथापि, भारतीय आणि चिनी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी शुल्क भरावे लागेल. कतारची जहाजे कोणत्याही शुल्काशिवाय या मार्गाने जाऊ शकतील. इराकला दिलेल्या सवलतीचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

भारतासाठी होर्मुझची सामुद्रधुनी महत्त्वाची

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 85 टक्केपेक्षा जास्त तेल इतर देशांकडून खरेदी करतो. यापैकी सुमारे 40 टक्के तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येते. सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांकडून भारतात येणाऱ्या तेलासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. होर्मुझची सामुद्रधुनी केवळ कच्च्या तेलासाठीच महत्त्वाची नाही. भारत आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणात एलएनजी आणि एलपीजीदेखील आयात करतो. त्यांच्या पुरवठ्यासाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे.

Advertisement
Tags :

.