इरा शर्मा कॅनडा ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये
वृत्तसंस्था / कॅलगरी (कॅनडा)
भारतीय बॅडमिंटनपटू इरा शर्मा मंगळवारी कॅलगरी येथील मार्खम पॅन अॅम सेंटर येथे झालेल्या पात्रता फेरीत विजय मिळवून कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या मुख्य ड्रॉसाठी पात्र ठरली.
बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत 84 व्या स्थानावर असलेल्या शर्माने जर्मनीच्या जागतिक क्रमवारीत 119 व्या स्थानावर असलेल्या मिरांडा विल्सनचा फक्त 34 मिनिटांत 21-9, 21-13 असा पराभव केला. तिच्या जर्मन प्रतिस्पर्ध्यांवर मिळविलेला तिचा हा सलग दुसरा विजय होता. गेल्या आठवड्यात यूएस ओपनमध्ये पात्रता फेरीतून सुरूवात केल्यानंतर प्री-क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचलेली इरा आता मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत बल्गेरियाच्या कालोयाना नालबांटोवाशी सामना करेल. ज्यामध्ये भारताच्या श्रीयांशी वालिशेट्टी आणि तान्या हेमंत यांचाही समावेश असेल.
दरम्यान, चिराग सेनला बीडब्ल्यूएफ सुपर 300 स्पर्धेत पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्याला पात्रता फेरीत मलेशियाच्या इओजीन इवेकडून 21-14, 21-10 असा पराभव पत्करावा लागला. सेन जगात 137 व्या स्थानावर आहे तर इवे 98 व्या स्थानावर आहे.
कॅनडा ओपन बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या क्षेत्रात माजी जागतिक अग्रमानांकित किदाम्बी श्रीकांत, यूएस ओपन चॅम्पियन आयुष शेट्टी, प्रियांशू राजावत आणि एस. शंकर मुथुस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची मजबूत उपस्थिती आहे. तथापि, फक्त दोन भारतीय शटलर दुसऱ्या फेरीत प्रवेश करतील. सातव्या मानांकित राजावतचा सामना श्रीकांतशी होणार आहे तर पाचव्या मानांकित आयुष बुधवारी पहिल्या फेरीत मुथुस्वामीशी खेळेल. मिश्र दुहेरीत अव्वल मानांकित ध्रुव कपिला आणि तनिशा क्रॅस्टो हे कॅनडा ओपनमध्ये खेळणारे एकमेव भारतीय जोडी आहे.