आयपीएस विवेक राज सिंह यांची ‘एनसीबी’मध्ये एन्ट्री तीन केडरमध्ये सेवा
नवी दिल्ली
वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा अधिकारी विवेक राज सिंह यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) उपमहासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आसाम-मेघालय केडरचे 2006 च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या आयपीएस विवेक राज सिंह यांची एनसीबीमधील नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर असेल. आता त्यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये ही नवीन जबाबदारी मिळाली आहे. आसाम-मेघालय केडरमधून कार्यमुक्त झाल्यानंतर ते एनसीबी कार्यालयात पदभार स्वीकारतील. त्यांना बिहार, मध्य प्रदेश आणि आसाम-मेघालय या तीन वेगवेगळ्या सेवा केडरमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
आयपीएस विवेक राज सिंह हे मूळचे मध्य प्रदेशचे आहेत. 2005 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची बिहार केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. बिहारमधील सासाराम येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी नक्षलविरोधी कारवाया यशस्वीपणे राबवल्या. त्यांनी बिहारच्या औरंगाबाद आणि लखीसराय जिह्यांमध्येही सेवा बजावली. एक तरुण आयपीएस अधिकारी म्हणून विवेक राज सिंह यांनी 2008 च्या सासाराम दंगलीदरम्यान उत्कृष्ट पोलीसिंगचा आदर्श घालून दिला. त्यांनी स्वत: घटनास्थळी पोहोचून दंगलखोरांशी वाटाघाटी करून परिस्थिती शांत केली होती. या त्यांनी काही काळ पाटणा येथे रेल्वे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केले आहे.