आयपीएस पराग जैन ‘रॉ’चे नवे प्रमुख
1 जुलैपासून पदभार स्वीकारणार : दोन वर्षाचा कार्यकाळ मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने 1989 च्या बॅचच्या पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी पराग जैन यांची देशाच्या गुप्तचर संस्थेच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे (रॉ) नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. ते 30 जून रोजी निवृत्त होत असलेल्या रवी सिन्हा यांची जागा घेतील. पराग जैन हे दीर्घकाळ ‘रॉ’शी संबंधित आहेत. त्यांनी माजी रॉ प्रमुख सामंत गोयल यांच्यासमवेत काम केले आहे. ते पाकिस्तान डेस्क हाताळत आहेत. त्यांनी कलम 370 हटवणे आणि बालाकोट हवाई हल्ला यासारख्या महत्त्वाच्या मोहिमांवर काम केले आहे.
पराग जैन हे एव्हिएशन रिसर्च सेंटरचे (एआरसी) प्रमुख देखील आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी छावण्या ओळखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पराग जैन यांनी एसएसपी चंदीगड आणि डीआयजी लुधियाना हे पदही भूषवले आहे. पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना त्यांनी अनेक दहशतवादविरोधी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जैन यांनी कॅनडा-श्रीलंकेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कॅनडामध्ये तैनात असताना त्यांनी खलिस्तान समर्थक नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. पराग जैन यांनी यूपीएससी पात्रता मिळवल्यानंतर आयपीएस (1989 बॅच, पंजाब केडर) म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ही परीक्षा पदवीधर स्तरावरील शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिली जाते.
रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) ही देशातील सर्वात छुपी आणि शक्तिशाली गुप्तचर संस्था मानली जाते. याची जबाबदारी बाह्य सुरक्षेशी संबंधित प्रत्येक माहिती वेळेत गोळा करणे आणि ती सरकारला देणे ही आहे. या महत्त्वाच्या संस्थेची कमान आता पराग जैन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मंत्रिमंडळ नियुक्ती समितीच्या मंजुरीनंतर सरकारने पराग जैन यांच्या नियुक्तीला अंतिम स्वरूप दिले. ते सध्या ‘रॉ’मध्ये विशेष सचिव म्हणून कार्यरत होते. आता त्यांना बढती मिळाल्यामुळे ग्रेडनुसार दरमहा 2.5 लाख रुपयांपर्यंत मूळ वेतन मिळेल. याशिवाय, त्यांना महागाई भत्ता, निवास व्यवस्था भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा यासारख्या सुविधा देखील दिल्या जातील. या सर्व भत्त्यांसह, त्यांचा एकूण पगार दरमहा 3.5 लाख ते 4 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.