Ajit Pawar यांची अहंकारी शैली की अधिकाराची ऐट? कोणते अजितदादा खरे?
व्हिडिओ क्लिपमुळे ‘नेता विरुद्ध अधिकारी’ असे ठोकळेबाज कथानक रंगवले गेले
By : संतोष पाटील
कोल्हापूर : माझा कार्यकर्ता असो की मी स्वत: किंवा माझे जवळचे नातेवाईक! कायद्याच्या चौकटीत चुकले तर सोडायचे नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे, असे बक्कळ टाळ्या घेणारे भाषण करणारे अजित पवार खरे की, अवैध उत्खनन प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्याला ‘मी कोण आहे, माहीत आहे का? अॅक्शन घेईन’ असे म्हणत कारवाई थांबवण्यासाठी फोन करणारे अजित पवार खरे? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
उजनी धरणातील पाणी साठ्याबाबत 12 वर्षांपूर्वीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा आयपीएस अंजना कृष्णा यांच्याशी झालेल्या संभाषण प्रकरणाने चर्चा निर्माण झाली आहे. यामुळे उठलेल्या गदारोळानंतर दादांची ही दादागिरी थांबणार की पुन्हा विरोधकांना आयते कोलीत देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
एआयच्या जमान्यात कोणीही आवाज बदलून कॉल करू शकतो. अशावेळी कारवाई थांबवण्यासाठी एक कार्यकर्ता थेट डीसीएमचा फोन जोडून देत असेल, तर आवाजाची सत्यता तपासण्याचा प्रयत्न त्या अधिकाऱ्याने केला, म्हणून बिघडले कुठे? सोलापूर जिह्यातील एका वाळू उत्खनन प्रकरणाशी संबंधित फोन संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला.
यानंतर अजित पवारांचे वक्तव्य कसे रोखठोकपणाचे असते, ते कसा प्रशासनाभिमुख कारभार करतात वैगेरे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्या पाठीराख्यांनी केला. या प्रकरणातून अंजना कृष्णा यांची वर्तणूक ही प्रामाणिक, निर्भय आणि नियमानुसार असल्याची चर्चा झाली.
त्यांच्या पाठीराख्यांनी अजित पवार यांची प्रतिमा तत्पर, परिणामाभिमुख नेत्याची अशी रंगवण्याचा प्रयत्न करत उथळपणा केला. यात त्यांनी आपल्या नेत्यापुढेच अडचणी वाढवल्या. विरोधकांनी पवारांचा प्रशासकीय हस्तक्षेप आणि अहंकारी शैलीवर बोट ठेवले.
बारामती असो वा पत्रकार परिषद, निवडणूक असो वा बैठका, प्रत्यक्ष असो वा फोनवर राजकीय थाटातील अजित पवार यांची दाबात बोलण्याची शैली नवीन नाही. पण यावेळी हे संभाषण एका महिला अधिकाऱ्याबाबत असल्याने ते अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
या व्हायरल व्हिडिओनुसार, कारवाई रोखण्यासाठी आलेल्या फोन कॉलवर अंजना कृष्णा यांनी समोरच्या व्यक्तीला खरेच डीसीएम आहे का, यासाठी खात्रीशीर पुरावा मागितला. त्या म्हणाल्या, ‘तुम्ही अजित पवार असाल तर माझ्या नंबरवर फोन करा. दुसऱ्याच्या फोनवर मी तुम्हाला कसे खरे मानू? कुणी बहुरूपी बोलत असेल तर?‘ ही भूमिका चुकीची नव्हती. मात्र, अजित पवारांची प्रतिक्रिया तीव्र होती.
त्यांनी ‘कारवाई करेन‘ अशी महिला अधिकाऱ्याला धमकीवजा भाषा वापरल्याने हा संवाद वादग्रस्त ठरला. अजित पवारांच्या राजकीय विरोधकांपेक्षा त्यांच्या पाठीराख्यांनी तो अधिक वादग्रस्त बनवला. यात पवारांच्या पाठीराख्यांच्या बालिशपणाने त्यांच्या अडचणीत अधिकची भर घातली. व्हिडिओ पाहता अंजना कृष्णा यांच्या बोलण्यात उद्धटपणा किंवा बंडखोरी नव्हती. ती केवळ प्रक्रियात्मक खात्री होती.
अजित पवारांनीही नंतर स्पष्टीकरण देत म्हटले की, त्यांचा हेतू हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर परिस्थिती शांत ठेवणे आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा होता. त्यांनी पोलीस दल आणि महिला अधिकाऱ्यांच्या धैर्याचा आदर व्यक्त केला आणि बेकायदेशीर क्रियांवर कठोर कारवाईची बांधिलकी जाहीर केली.
अजित पवारांनी स्पष्टीकरण देत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला असताना, त्यांच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांनी अंजना कृष्णा यांच्या जातप्रमाणपत्राची चौकशी मागितली. तर उमेश पाटील यांनी स्थानिक पातळीवर प्रश्न उपस्थित केले. मिटकरी यांना जाहीर माफी मागत एक्स वरील पोस्ट डिलिट करावी लागली.
अमोल मिटकरी यांना नेटकऱ्यांनी फैलावर घेताच अजित पवारांच्या समर्थनार्थ दुसऱ्यांदा एक्सवर केलेल्या पोस्टचा इनबॉक्स बंद केला, हा संकेत बरेच काही सांगून जाणारा आहे. या घटनेने अजित पवारांनी विशेषत: विधानसभा निवडणुकीनंतर पिंक जॅकेट घालत केलेल्या कॅम्पेनमधून लाडक्या बहिणींचा आधारवड या प्रतिमेला नख लागले, हे मात्र मान्य करावेच लागेल.
‘टोन आणि टेम्पर’चा प्रश्न?
व्हिडिओ क्लिपमुळे ‘नेता विरुद्ध अधिकारी’ असे ठोकळेबाज कथानक रंगवले गेले. प्रकरण अंगलट येण्याचा धोका ओळखून अजित पवार यांचे स्पष्टीकरण आले. कायदा-सुव्यवस्थेची काळजी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न झाला. तरीही त्यांच्या बोलण्याचा ‘टोन आणि टेम्पर’चा प्रश्न राहतोच.
या प्रकरणानंतर महायुतीतील एकही मित्रपक्ष त्यांच्यासाठी धावून आला नाही, हे विशेष. प्रेस कॉन्फरन्सपासून अधिकाऱ्यांच्या बैठकीत समोरच्याला नामोहरम करण्याची अजित पवार यांची बोलण्याची शैली त्यांच्या फॅन फॉलोअर्सना कदाचित स्पष्टवत्तेपणा वाटत असेल, पण प्रत्यक्षात ती सत्तेची रग असून त्यातून आलेली बोलण्यातील धग असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
ही कसली शैली? अजित पवार जे काही बोलतील ते स्पष्टवत्तेपणा, हीच त्यांची शैली आहे, असे जाणीवपूर्वक त्यांचे पाठीराखे महाराष्ट्राकडून वदवून घेतात. इतर कोणी नेते त्यांच्या शैलीत चुकूनही बोलले तर मात्र तो वाचाळपणा ठरतो. अजित पवार यांनी महिला अधिकाऱ्यासोबत बोलताना तारतम्य बाळगण्याची गरज होती.
शैली, स्पष्टवत्तेपणा आणि सत्ता सोपानावर बसून ‘कारवाई करू’ असे धमकीवजा बोलणे यात फरक आहे. एका महिला अधिकाऱ्याला असे बोलणे हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाला अशोभनीय असल्याची तिखट प्रतिक्रिया उमटत आहे.
मागील वाद आणि भविष्य
8 एप्रिल 2013 रोजी सोलापूर जिह्यातील उजनी धरणात पाणी सोडण्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूरच्या सभेत ‘धरणात पाणी नाही, मग मी मुतू करून पाणी भरू का?‘ असे वक्तव्य असो किंवा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मतदान न केल्यास पाणीपुरवठा तोडण्याची एका गावाला दिलेली धमकी असो किंवा आताच्या आयपीएस अंजना कृष्णा यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ असो, अशा क्षणिक प्रतिक्रियांचा दीर्घकालीन परिणाम होत असल्याचे अजित पवारांना माहीत नाही का? पण ‘अलिकडे अजित पवार चिडत नाहीत‘ यापासून ‘दादांची ती बोलण्याची शैली आहे‘ असे त्यांचे वरिष्ठ मंत्री, पक्षातील जोडीदार सांगतात. पण यातून बोध घेऊन महायुतीच्या अंतर्गत राजकीय कलहात विरोधकांना आयते कोलीत देण्यापासून पवार आणि त्यांची टीम किती काळ दूर राहते, हे काळच सांगेल.