जिओ प्लॅटफॉर्मसह पाच कंपन्यांच्या आयपीओला मंजुरी
सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता: लवकरच तारीख जाहीर होणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या मालकीचा जिओ प्लॅटफॉर्म यांचा आयपीओ सादर होण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच सादरीकरणाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. सदरच्या जिओ प्लॅटफॉर्मच्या आयपीओला बाजारातील नियामक सेबी यांनी मंजुरी दिली आहे. दुसरीकडे अन्य पाच कंपन्यांच्या आयपीओलाही सेबीने हिरवा कंदील दाखविला आहे.
देशातील सर्वात चर्चीत असा आयपीओ म्हणून पाहिला जात असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म यांचा आयपीओ अखेर सादरीकरणासाठी सज्ज झाला आहे. सेबीने नुकतीच जिओच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. सेबीची मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीने या आयपीओ सादरीकरणाच्या प्रक्रियेला आता वेग देण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत कंपनी 27 कोटी नवे समभाग सादर करणार आहे. जिओ प्लॅटफॉर्मने 19 जून 2026 रोजी सेबीकडे आयपीओ मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे दाखल केली होती.
सदरच्या आयपीओ सादरीकरणातील तयारी सुरु असली तरी आयपीओ कधी सादर केला जाणार याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. प्रत्येक समभागाची फेसव्हॅल्यू 10 रुपये असणार असून हा इश्यू पूर्णपणे ताज्या समभागांचा असेल. म्हणजेच याचा अर्थ कंपनीतील सध्याचे समभागधारक आयपीओमध्ये आपली हिस्सेदारी विकणार नाहीत आणि समभागांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम ही जिओ प्लॅटफॉर्मकडे जमा होईल. याच दरम्यान कंपनीने आयपीओकरीता कोटक महिंद्रा कॅपिटल यांना लिड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. सेबीची मंजुरी मिळाल्यानंतर आता गुंतवणुकदारांच्या नजरा कंपनीकडून जारी होणाऱ्या रेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट आणि आयपीओची तारीख यावर असणार आहे.
या 5 कंपन्यांच्या आयपीओलाही मंजुरी
जिओ प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त सेबीने इतर पाच कंपन्यांच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. यामध्ये पारस हेल्थकेअर, पूष्प ब्रँड इंडिया, एम. के. सन्स फाईन ज्वेल्स, सदभाव फ्यूचर टेक आणि भारत पीईटी या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी मार्च ते जून या कालावधीत आयपीओकरीता सेबीकडे अर्ज सादर केला होता. भारत पीई&टी ही कंपनी आयपीओतून 760 कोटी रुपये उभारणार आहे. यामध्ये 120 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी समभाग सादर केले जातील. दुसरीकडे प्रवर्तक 640 कोटी रुपयांचे समभाग विक्रीकरीता उपलब्ध करतील.
सदभाव, पारस यांचेही येणार आयपीओ
सदभाव फ्यूचर टेक यांनी 7 एप्रिल रोजी आयपीओकरीता अर्ज दाखल केला होता. 28 ऑगस्ट रोजी सेबीने आयपीओला हिरवा कंदील दाखवला. 235 कोटी रुपयांचा हा आयपीओ असणार असून 2.55 कोटी ताजे समभाग सादर केले जाणार आहेत. पारस हेल्थकेअरने 16 जून रोजी आयपीओकरीता सेबीकडे अर्ज दाखल केला होता. 24 ऑगस्टला कंपनीने आयपीओकरीता मंजुरी दिली. सदर आयपीओ अंतर्गत कंपनी 1800 कोटी रुपये उभारणार आहे. यामध्ये 500 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी समभाग असणार आहेत. 1300 कोटी रुपयांचे समभाग सध्याच्या समभागधारकांकडून विक्रीसाठी उपलब्ध केले जातील.
एमके सन्स फाईन ज्वेल्स यांनी 14 मे ला आयपीओकरीता अर्ज दाखल केला होता. 28 ऑगस्ट रोजी सेबीने आयपीओला मंजुरी दिली. या आयपीओ अंतर्गत 1.36 कोटी नवे इक्विटी समभाग सादर केले जाणार आहेत. याशिवाय प्रवर्तक रामचंद मुरलीधर रैमलानी 34 लाख पर्यंत समभाग विक्रीकरीता उपलब्ध करतील.
जियो उभारणार 37 हजार कोटी
देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ म्हणून आता जियो प्लॅटफॉर्मचे नाव गाजणार आहे. कंपनी आयपीओतून 37 हजार कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओतून सदरची रक्कम उभारली गेल्यास ह्युंडाई मोटर इंडियाचा विक्रम मोडीत निघणार आहे. ह्युंडाईने 27 हजार 870 कोटी रुपये उभारले होते. रिलायन्स इंडस्ट्रिजची जियोमध्ये 66 टक्के इतकी हिस्सेदारी आहे.