5 कंपन्यांचे आयपीओ होणार गुंतवणूकीसाठी खुले
3585 कोटी रुपयांची होणार उभारणार, विक्रम सोलारसह इतर कंपन्यांचा समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारपासून सुरु झालेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात पाच कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. या आयपीओच्या माध्यमातून एकंदरीत 3585 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. एकंदर मेन बोर्डवरती पाच कंपन्यांचे आयपीओ खुले होणार आहेत. यामध्ये चार आयपीओ गुंतवणूकीसाठी 19 ऑगस्ट रोजी खुले होऊन 21 ऑगस्ट रोजी बंद होतील. या चार आयपीओंच्या माध्यमातून 3185 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. मंगल इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांचा आयपीओ 20 ऑगस्ट रोजी खुला होणार असून 22 ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 400 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. आयपीओ करिता 533-561 रुपये प्रति समभाग अशी इशू किंमत कंपनीने निश्चित केली आहे.
विक्रम सोलार, श्रीजी शिपिंगचा आयपीओ
याच दरम्यान 19 ऑगस्ट रोजी विक्रम सोलारचा आयपीओ खुला होणार असून कंपनी या मार्फत 2079 कोटी रुपये उभारणार आहे. यामध्ये 1500 कोटी रुपयांचे ताजे समभाग विक्रीकरता उपलब्ध केले जाणार असून कंपनीच्या प्रवर्तक आणि समभागधारकांकडून 1 कोटी 74 लाख रुपयांचे समभाग ऑफर फॉल सेल अंतर्गत सादर केले जाणार आहेत. 315 ते 332 रुपये प्रति समभाग अशी इशू किंमत असणार असून एका लॉटमध्ये 45 समभागांचा समावेश असेल. जेम एरोमॅटिक्स आयपीओच्या माध्यमातून 451 कोटी रुपये तर श्रीजी शिपिंग ग्लोबल हे आपल्या आयपीओतून 410 कोटी रुपये उभारणार आहेत. जेम एरोमॅटिक्स 46 समभागांच्या लॉट करिता 309 ते 325 रुपये प्रति समभाग अशी इशू किंमत ठेवली गेली आहे. श्रीजी शिपिंगच्या इश्युची किंमत 240 ते 252 रुपये प्रति समभाग ठेवण्यात आलेली आहे.
पटेल उभारणार 242 कोटी
पटेल रिटेल कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून 242 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. सदरचा आयपीओ हा गुंतवणुकीसाठी 19 ऑगस्ट रोजी खुला होणार आहे. 237 ते 255 रुपये प्रति समभाग अशी आयपीओची इश्यु किंमत निश्चित करण्यात आली आहे. 28 समभागांचा एक लॉट असणार आहे. सदरची कंपनी अंबरनाथ येथे कार्यरत असून ही एक रिटेल सुपर मार्केट चेन कंपनी आहे. शिपिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी श्रीजी शिपिंग ही कंपनी जामनगरमध्ये कार्यरत आहे.