नव्या वर्षात येणार 24 कंपन्यांचे आयपीओ
2025 मध्ये होणार लिस्ट : सेबीकडून मंजुरी : आणखी 62 कंपन्यांचे अर्ज
वृत्तसंस्था/ चेन्नई
बाजारातील नियामक सेबी यांनी 24 कंपन्यांना आयपीओ सादरीकरणासाठी मंजुरी दिलेली आहे. तर यासोबत जवळपास 62 कंपन्यांनी आपल्या आयपीओकरीताचे अर्ज सेबीकडे दाखल केले असल्याची माहिती आहे. पुढच्या वर्षी दिग्गज कंपन्यांचे आयपीओ सादर होणार असून एलजी, झेप्टो आणि फ्लिपकार्ट यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.गुंतवणूकदारांनी आता नव्या वर्षासाठी पैसे गुंतवण्यासाठी सज्ज राहायचं आहे. नव्या कंपन्यांचे आयपीओ नव्या वर्षीही बाजारात दाखल होणार आहेत, त्यासाठी कंपन्यांची जय्यत तयारी सुरु आहे. पाहुया काही महत्त्वाच्या दिग्गज कंपन्यांची माहिती
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया : दक्षिण कोरियातील मोठी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स यांचा आयपीओ दाखल होणार आहे. इशुच्या माध्यमातून 10.1 कोटी समभागांची विक्री ऑफर फॉर सेलअंतर्गत करत 15,237 कोटी रुपये उभारण्याची तयारी कंपनी करते आहे. एनएसडीएल (नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझीटरी लिमिटेड) : भारतातील सर्वात मोठी डिपॉझीटरी कंपनी एनएसडीएल ही कंपनीही पुढील वर्षी आयपीओ आणणार आहे. कंपनी आयपीओअंतर्गत ऑफर फॉर सेलमार्फत 3000 कोटी रुपयांची उभारणी करण्याची योजना बनवत आहे.
फ्लिपकार्ट : इकॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्ट यांचाही आयपीओ बाजारात दाखल केला जाणार आहे. या आयपीओवरही गुंतवणूकदारांचे खासे लक्ष असणार आहे. 2025 च्या अखेरपर्यंत अथवा 2026 च्या सुरुवातीच्या महिन्यात यांचा आयपीओ बाजारात सादर होऊ शकतो.
जेएसडब्ल्यू सिमेंट : सिमेंट उद्योग क्षेत्रातील जेएसडब्ल्यू सिमेंट यांचाही आयपीओ नव्या वर्षी बाजारात सादर होत आहे. आपल्या उत्पादन कारखान्यातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, व्यवसाय विस्तारासाठी निधी वापरला जाणार आहे.
झेप्टो : झोमॅटो आणि स्विगी यांच्या पाठोपाठ आता शेअर बाजारात आणखी एक कंपनी आपला आयपीओ सादर करण्यासाठी उत्सुक दिसते आहे. क्विक कॉमर्स स्टार्टअप कंपनी झेप्टो आपला आयपीओ सादर करणार आहे, ज्या योगे 1 अब्ज डॉलरची रक्कम उभारली जाणार आहे.
अॅथर एनर्जी : इव्ही निर्माती कंपनी
अॅथर एनर्जी यांचा आयपीओ भारतीय शेअर बाजारात दाखल होणार आहे. ओला मोबिलीटी यांचा आयपीओ यावर्षी बाजारात दाखल झाल्यानंतर अॅथरनेही आयपीओ आणण्याचे ठरवले. कंपनी आयपीओतून 4500 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे.