वेस्टर्न कॅरियर्सचा आयपीओ झाला खुला
वृत्तसंस्था / मुंबई
कोलकत्यातील लॉजिस्टीक क्षेत्रातील कंपनी वेस्टर्न कॅरियर्स लि. यांचा आयपीओ 13 सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 493 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. वेस्टर्न कॅरियर्सने आयपीओकरिता 163-172 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित केली आहे. 13 सप्टेंबरला आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला असून गुंतवणुकदारांना 18 सप्टेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
400 कोटी रुपयांचे ताजे समभाग आयपीओअंतर्गत विक्रीसाठी सादर केले जाणार आहेत. या आयपीओच्या माध्यमातून उभारलेली रक्कम कंपनी येणाऱ्या काळामध्ये कर्ज चुकविण्यासाठी, भांडवल क्षमता वाढविण्यासाठी व इतर गोष्टींसाठी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदरच्या आयपीओमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायला हरकत नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
आयपीओ 23 सप्टेंबर रोजी बीएसई व एनएसईवर सूचिबद्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. जेएम फायनान्शीयल आणि कोटक महिंद्रा कॅपिटल हे या आयपीओचे मुख्य व्यवस्थापन पाहणार आहेत.