दोन कंपन्यांचे आयपीओ येणार बाजारात
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात या आठवड्यामध्ये दोन कंपन्यांचे आयपीओ सादर होणार आहेत. यामध्ये एमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि बंसल वायर इंडस्ट्रीज लिमिटेड या दोन कंपन्यांच्या समभागांचा समावेश आहे.
3 ते 5 जुलै पर्यंत खुला
दोन्ही कंपन्यांचे आयपीओ गुंतवणूकदारांसाठी 3 जुलै ते 5जुलै या दरम्यान खुले राहणार आहेत. 10 जुलै रोजी दोन्ही कंपन्यांचे समभाग नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसई आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसईवर सूचिबद्ध होणार आहेत.
एमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेड
एमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही कंपनी आपल्या आयपीओमार्फत एकंदर 1952 कोटी रुपये उभारणार आहे. यासाठी कंपनी 800 कोटी रुपयांचे ताजे समभाग जारी करणार असून सध्याचे गुंतवणूकदार ऑफर फॉर सेल अंतर्गत 1152 कोटींचे समभाग विक्रीसाठी ठेवणार आहेत. या आयपीओ करिता कंपनीने प्रति समभागाची किंमत 960-1008 रुपये निश्चित केली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी म्हणजे 14 समभागांसाठी बोली लावता येणार आहे.एमक्युअर फार्मास्युटिकल्स ही कंपनी 1981 मध्ये स्थापन झाली आहे. औषध बनवणारी ही कंपनी असून कंपनीचे भारतामध्ये 13 निर्मिती कारखाने आहेत.
बंसल वायर इंडस्ट्रीज लिमिटेड
आणखी एक कंपनी बंसल वायर इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या आयपीओच्या माध्यमातून 745 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीचे सर्व सध्याचे गुंतवणूकदार ऑफर फॉर सेल अंतर्गत समभाग विक्री करणार नाहीत. कंपनीने समभागाची किंमत 243-256 अशी प्रति समभाग ठेवली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी म्हणजेच 58 समभागांसाठी बोली लावता येणार आहे.