‘क्वालिटी पॉवर’चा आयपीओ खुला
गुंतवणूकदार 18 फेब्रुवारीपर्यंत बोली लावू शकतील : 21 रोजी शेअर बाजारात समभाग सूचीबद्ध होणार
मुंबई :
क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजेच आयपीओ शुक्रवारी खुला झाला आहे. गुंतवणूकदार 18 फेब्रुवारीपर्यंत या इश्यूसाठी बोली लावू शकतात. कंपनीचे समभाग हे 21 फेब्रुवारी रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वर सूचीबद्ध होणार असल्याची माहिती आहे. कंपनी या इश्यूद्वारे एकूण 858.70 कोटी उभारू इच्छिते. यासाठी, क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सचे विद्यमान गुंतवणूकदार ऑफर फॉर सेल म्हणजेच ओएफएसद्वारे 633.70 कोटी किमतीचे 1,49,10,500 शेअर्स विकत आहेत. त्याच वेळी, कंपनी आयपीओसाठी 225 कोटी किमतीचे 52,94,118 नवीन समभाग सादर करणार आहे.
किमान आणि कमाल ठेव रक्कम किती आहे?
क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सने आयपीओची 401-425 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एका लॉटसाठी म्हणजेच 26 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. जर तुम्ही आयपीओच्या किंमत 425 वर 1 लॉटसाठी अर्ज केलात तर तुम्हाला 11,050 रुपये गुंतवणूक करावी लागणार असल्याची माहिती आहे.