शेअरबाजारात 6 कंपन्यांचे येणार आयपीओ
सेबीकडून आयपीओस मान्यता : एचडीबी फायनॅन्शीयलचा येणार आयपीओ
वृत्तसंस्था/ मुंबई
गेल्या काही महिन्यातील निराशेनंतर शेअर बाजारामध्ये आता कंपन्या नव्याने आयपीओ दाखल करण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. लवकरच एचडीएफसी बँकेची सहकारी कंपनी एचडीबी फायनॅन्शीयल यांचा आयपीओ शेअर बाजारात सादर केला जाणार आहे. यासोबत इतर 6 कंपन्यांनाही सेबीने आयपीओ सादरीकरणासाठी मंजुरी दिली आहे. बाजारातील नियामक सेबीने एचडीबी फायनॅन्शीयलला परवानगी दिली आहे. आयपीओच्या माध्यमातून एचडीबी फायनॅन्शीयल सर्विसेस ही कंपनी 20 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. हा सर्वाधिक मूल्याचा असणार असल्याचे सांगितले जात आहे.
6 कंपन्यांच्या आयपीओला मंजुरी
येणाऱ्या काळामध्ये पाहता सहा कंपन्या आपला आयपीओ सादर करणार असून या सहा कंपन्यांना सेबीने मंजुरी दिली आहे. एचडीबी फायनॅन्शीयल सोबतच डॉर्फ केटल केमिकल, विक्रम सोलार, ए वन स्टील, शांती गोल्ड, श्रीजी शिपिंग या कंपन्यांनाही आयपीओ सादरीकरणासाठी सेबीने मंजुरी दिली आहे. डॉर्फ केटल केमिकल 5000 कोटी रुपये, विक्रम सोलार 1500 कोटी रुपये, ए वन स्टील 650 कोटी रुपये उभारणार आहे. 6 पैकी 3 कंपन्या ऑफर सेल अंतर्गत समभाग सादर करणार आहेत. एचडीबी फायनान्शिअल कंपनी आयपीओ अंतर्गत 10 हजार कोटी रुपयांचे समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर करणार आहे. उर्वरित 2500 कोटी रुपये हे ताज्या समभागांमधून उभारले जातील असे म्हटले जात आहे. डॉर्फ केटल केमिकल ही कंपनी 5000 कोटी रुपये उभारणार असून 3500 कोटी रुपये ऑफर फॉर सेल अंतर्गत आणि 1500 कोटी रुपयांचे ताजे समभाग विकणार आहे.