शेअर बाजारात 4 कंपन्यांचे येणार आयपीओ
सेबीकडे अर्ज दाखल : फार्मा क्षेत्रातल्या 2 कंपन्यांचे अर्ज
वृत्तसंस्था/ मुंबई
2024 मध्ये सातत्याने आयपीओ लाँच होत असून आता नव्याने काही कंपन्या आपले आयपीओ लॉन्च करणार आहेत. यामध्ये फार्मा क्षेत्रातील कंपनी रुबिकॉन रिसर्च आणि टीपीजी कॅपिटलचे पाठबळ लाभलेल्या साई लाईफ सायन्सेस यांचा समावेश असणार आहे.
चार कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार असून त्यांनी आपला रितसर अर्ज सेबीकडे दाखल केला आहे. चारपैकी सनातन टेक्स्टाईल्स आणि सुट्या वाहनांची निर्मिती करणाऱ्या मेटलमॅन ऑटो यांच्या अर्जाला सेबीने परवानगी दिली असल्याचे समजते.
या आहेत कंपन्या : रुबिकॉन रिसर्च, साई लाईफ सायन्सेस,सनातन टेक्सटाइल्स , मेटलमॅन ऑटो
या चार कंपन्यांचे आयपीओ दाखल करण्यासंदर्भात सेबीकडे अर्ज दाखल झाले आहेत. चारही कंपन्यांनी आपले अर्ज जुलै आणि ऑगस्टमध्ये सेबीकडे दाखल केले होते.
रुबिकॉन रिसर्च
सदरच्या कंपनीला आयपीओअंतर्गत 1085 कोटी रुपये उभारायचे असून 500 कोटी रुपयांचे नवे इक्विटी समभाग सादर करायचे आहेत. त्यासोबत प्रवर्तक जनरल अटलांटिक सिंगापूर आर आर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून 585 कोटी रुपयांचे समभाग विक्रीला ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर केले जातील. जनरल अटलांटिक यांच्याकडे रुबिकॉन रिसर्चमध्ये 57 टक्के हिस्सेदारी आहे.
साई लाईफ सायन्सेस
हैदराबादमधील या कंपनीला आयपीओ अंतर्गत 800 कोटी रुपयांची उभारणी करायची असून यामध्ये ताजे समभाग सादर केले जाणार आहेत. प्रवर्तक गुंतवणूकदार समभागधारक आणि अन्य समभागधारकांद्वारे 6.15 कोटी समभाग ऑफर फॉर सेलअंतर्गत सादर केले जाणार असल्याचे कळते
सनातन टेक्स्टाईल्स
सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 500 कोटी रुपयांचे ताजे समभाग विक्रीकरता सादर करणार आहे. प्रवर्तक समूहाकडून 300 कोटी रुपयांचे समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गतदेखील सादर केले जातील.
मेटलमॅन ऑटो
मेटलमॅन ऑटो या कंपनीने आयपीओअंतर्गत 350 कोटी रुपयांचे इक्विटी समभाग नव्याने सादर करण्याचे ठरवले आहे. यांच्या प्रवर्तकांकडून 1.26 कोटी समभाग ऑफर फॉर सेलअंतर्गत सादर केले जाणार आहेत.