आयपीओ मंजुरीला आता होणार नाही उशीर
सेबीच्या चेअरमन : नव्या तंत्रज्ञानाची घेणार मदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेअर बाजारातील नियामक सेबी लवकरच एका नव्या तंत्रावर काम करत असून या मार्फत आयपीओला लवकरात लवकर मंजुरी मिळणे शक्य होणार आहे. सदरची माहिती सेबीच्या चेअरमन माधवी पुरी बुच यांनी दिली आहे. फिक्कीच्या कॅपम या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
शेअर बाजारात दाखल होणाऱ्या कंपन्यांच्या आयपीओंना मंजुरी लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमता)टूल विकसित केले जात आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे टूल पूर्णपणे सक्षम होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कंपन्यांच्या सार्वजनिक प्रारंभिक प्रस्ताव अर्थात आयपीओ प्रक्रियेमध्ये जटिलता खूप असल्यामुळे याला मंजुरी मिळण्यासाठी खूप वेळ लागतो आहे. याची दखल घेतली गेली असून त्यासंबंधीची कार्यवाही करण्यात येत आहे. ही प्रक्रिया आता अधिक सुलभ तसेच अधिक सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासंदर्भात कंपनी एक टेम्प्लेट तयार करण्यात आलेले आहे. एखाद्या किचकट बाबीसंदर्भात काही समस्या असतील तर त्याकरता वेगळा कॉलम असणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.